- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या सात उपनगरीय रुग्णालयांमध्ये नाश्ता आणि जेवण पुरवण्यासाठी नेमलेल्या संस्थेला विनानिविदाच कामे देण्यात आल्याची माहिती समोर येत असून, मार्च २०२१ मध्ये केवळ ११ महिन्यांसाठी नेमलेल्या संस्थेला प्रत्येक ११ महिन्यांच्या कालावधीकरता मुदतवाढ देत हे काम मार्च २०२५ पर्यंत वाढवून दिले आहे. त्यामुळे ३.३२ कोटींचे काम मंजूर असताना विनानिविदा या संस्थेला आतापर्यंत सुमारे १७ कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याची माहितीच समोर आली आहे. महापालिकेत कोणतेही काम विना निविदा न काढता दिले जात नाही, त्यातच आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिलेली असून ही मुदत संपत असतानाही प्रशासनाने निविदा न मागवता परस्पर ही कामे देण्यात आल्याने या संस्थेला मुदतवाढ देण्यामागील कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
(हेही वाचा – Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ट्रेडिंग’ सायबर फसवणुकीचे केंद्रबिंदू दुबई व्हाया चीन)
मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के.बी.भाभा रुग्णालय, कुर्ला के.बी.भाभा रुग्णालय, सांताक्रुझ व्ही.एन. देसाई रुग्णालय, बर्वेनगर संत मुक्ताबाई रुग्णालय, मुलुंड म.तु.अगरवाल रुग्णालय या एकूण ०५ उपनगरीय रुग्णालयांतील आंतर रुग्णांना थाळी पद्धतीने सकाळचा चहा, बिस्किट व नास्ता व दुपारचा चहा बिस्किट व दोन वेळच्या शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करण्यासाठी अधिक रिसॉर्ट इंडिया प्रा. लि. कंपनीची मार्च २०२१ मध्ये निवड केली होती. १५ जुलै २०२१ पासून १४ जून २०२२ पर्यंत प्रथम ११ महिन्यांसाठी मंजूर केलेल्या एकूण २ लाख ०८ हजार ९९४ थाळ्यांच्या संख्येसाठी एकूण ३ कोटी ३२ लाख ९२ हजार ७४४ रुपयांच्या कामासाठी दिली. त्यानंतर नव्याने निविदा निमंत्रित न करता महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याच संस्थेला यापूर्वीच्या पाच उपनगरीय रुग्णालयांसह जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रौमा रुग्णालय, विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, या दोन अतिरिक्त रुग्णालयांना एकूण थाळींची प्रतिदिन संख्या ९५० मर्यादित ठेवून १५ जून २०२२ ते १४ मे २०२३ या कालावधीत एकूण २ लाख ७२ हजार ०९४ थाळ्यांसाठी ४.३३ कोटींच्या कामांना मुदतवाढ दिली आणि त्यानंतर १५ मार्च २०२३ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीसाठी पुन्हा मदतवाढ देण्यात आली. (BMC)
(हेही वाचा – Army Aviation Training School : अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरमुळे वाढेल सैन्य दलाची ताकद – ले. जनरल नांबियार)
त्यामध्ये ४.४९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर पुन्हा याच संस्थेला एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या ११ महिन्यांसाठी मंजूर केलेल्या ३.३२ कोटी रुपयांच्या कामांच्या तुलनेत या कामांचा खर्च तब्बल सुमारे १७ कोटींच्या घरांत जावून पोहोचला आहे. त्यामुळे तब्बल चार वेळा मुदतवाढ देताना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला महापालिकेच्या नियमांचे पालन करावे असे वाटले नाही. त्यामुळे या विनानिविदा दिलेल्या कामांमागे नक्की कुणाचा हात आहे असा सवाल केला जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community