यंदाच्या पावसाळापूर्व कामांसाठी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांमध्ये महिला अभियंत्यांचाही तितकाच महत्वाचा वाटा राहिला आहे. महानगरपालिका क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला अभियंत्यांची ही टीम आपली जबाबदारी दक्षपणे पार पाडत आहे. मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या विभागासाठी १८ महिला अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यात मुंबई शहरात १ दुय्यम अभियंता, पूर्व उपनगरात ९ दुय्यम अभियंता, पश्चिम उपनगरामध्ये ७ दुय्यम अभियंता कार्यरत आहेत. तर पश्चिम उपनगरात १ सहायक अभियंता अशी एकत्रित १८ महिला अभियंत्यांची टीम नालेसफाईच्या कामांसह नाल्यांच्या बांधकामांवरही विशेष लक्ष देऊन आहे.
विशेषतः पावसाळापूर्व कामे मार्च महिन्यापासून सुरू होतात. नाल्यातून गाळ काढण्याची कामे होतात, तेव्हा अतिशय उकाड्याच्या वातावरणापासून ते पावसाळ्यात जोरदार पाऊस असलेल्या स्थितीतही ग्राऊंड झिरोवर पुरुषांइतकीच जबाबदारी महिला अभियंता वर्गाला पार पाडावी लागते. कर्तव्यात पुरपष महिला असा कोणताही भेद होत नाही. पर्जन्य जलवाहिन्या विभागात आम्हालाही अशी सेवा बजावताना मुंबईकरांसाठी एक चांगली सेवा देण्याचा आम्हालाही अभिमान वाटतो, असे या महिला अभियंता सांगतात.
(हेही वाचा – BMC : शौचालय उभारणीत महापालिकेची जागा निवड चुकली; दोन वर्षांपूर्वी बनवलेले शौचालय वापरण्यापूर्वीच बनले खंडर)
मुंबईकर नागरिकांकडून काय अपेक्षित करता, ह्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना या महिला अभियंता सांगतात की, नाल्यातून गाळ काढण्याचे काम हे ठिकठिकाणी पोहोचून करावे लागते. अशावेळी नागरिकांकडूनही आम्हाला प्रतिसाद अपेक्षित असतो. अनेकदा नाल्यातून गाळ किंवा तरंगता कचरा काढण्याचे काम सुरू असतानाही नजरेदेखत नागरिक नाल्यात कचरा टाकतात. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नाल्यात कचरा टाकू नये, कचरा संकलन व्यवस्थेचा उपयोग करावा, यातून महानगरपालिकेने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. अनेकदा गाद्या, सोफा आणि चक्क स्कुटी यासारख्या मोठ्या अडथळा ठरणाऱ्या वस्तुही नाल्यात फेकून दिल्याचे आढळले आहे. अशा वस्तू उदंचन केंद्र, पातमुख किंवा पूरप्रतिबंधक दरवाजे अशा ठिकाणी अडकून मोठी समस्या उभी राहते आणि त्याचा फटका संपूर्ण परिसराला बसतो. त्यामुळे नागरिकांनी देखील जबाबदारीने वागून मुंबईसाठी मदत करावी, असे नम्र आवाहन या महिला अभियंत्यांनी केले आहे. मुंबईत महिला अभियंता महत्वाचे योगदान देत आहेत. भविष्यात मुंबई महानगरासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा टक्का आणखी वाढावा, अशी अपेक्षा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी व्यक्त केली आहे. मुंबईकर नागरिकांनी देखील नाल्यात कचरा टाकू नये आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार यांनी केले आहे.
हिंदमाता परिसर जलमुक्त राखण्यासाठी यंदा प्रमोद महाजन उद्यान येथे पाणी साठवण टाक्यांच्या प्रकल्पाकरिता पर्जन्य जलवाहिन्या विभागात सहायक अभियंता म्हणून स्नेहल पाटील कार्यरत आहेत. मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात या साठवण टाक्यांमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास स्नेहल पाटील यांना वाटतो.
मुंबईतील नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा न टाकता आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वागणुकीतील एक छोटासा बदल हा आगामी काळातील समस्या वाढवण्यापासून दिलासा देऊ शकतो, असे टी विभागातील दुय्यम अभियंता रश्मी उभारे यांनी सांगितले. नव्या पिढीच्या महिला अभियंत्यांना महानगरासाठी हे काम किती महत्वपूर्ण आहे, ही बाब समजून या विभागासाठी अधिकाधिक योगदान देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community