मंगळवारी भिवंडीतील ८ महिन्यांच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. या बालकाच्या मृत्यूबाबत बुधवारी सायंकाळी पालिका आरोग्य विभागाने माहिती जारी केली. शरीरावर पुरळ दिसून आल्यानंतर दोन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. बुधवारी १५६ संशयित गोवरबाधित रुग्ण दिसून आलेत, आतापर्यंत मुंबईत ३ हजार ५३४ बालके संशयित रुग्ण म्हणून पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांना सापडली आहेत. या आधीही आठवडाभरापूर्वी भिवंडीत एका बालकाचा गोवरने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.
१८ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी बाळाला ताप आला होता. दोन दिवसांनी त्याच्या शरीरावर पूरळ दिसून आले. त्याच दिवशी बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पालकांनी त्याला पालिका रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी बाळाचा मृत्यू झाला. मुंबईत आता गोवरबाधित बालकांची संख्या २३३ वर पोहोचली असून, आतापर्यंत ८ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर १ संशयित मृत्यू आहे. मुंबईबाहेर राहणा-या ३ बालकांचाही मृत्यू झाला आहे.
बुधवारी नव्या १३ रुग्णांचे निदान
- गोवर लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या वस्तीमध्ये सुरुवातीला मुंबईतून पसरु लागला. आता दक्षिण मुंबईतही गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत.
- १३ रुग्णांची वॉर्डनिहाय माहिती
- ए -३, डी-१, एफ-उत्तर – १, पी-उत्तर – २, आर-उत्तर – २, एन-१, एस – ३
- बुधवारपर्यंतची रुग्णालयात उपचार घेतलेल्या गोवरबाधितांची माहिती
- रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या ३०
- रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज रुग्णांची संख्या – २२