सध्या चित्रपट, जाहिरातीमधून हिंदू देवदेवता, धर्मग्रंथ आणि रूढी-परंपरा यांचे विडंबन केले जात आहे, असेच विवाहानंतर वधूच्या गृहप्रवेशाच्या रूढी-परंपरेचे एयु बँकेच्या जाहिरातीत करण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कियारा या दोघांना घेऊन बँकेने ही जाहीरात केली आहे. त्यावर जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर यांनी सडकून टीका केली आहे. कोणती रूढी-परंपरा बदलणे अथवा काहीतरी क्रांती घडवून आणणे असा जाहिरातीमागील उद्देश नसतो, त्यामुळे ए यु बँकेची जाहिरात टाकाऊ आहे, अशा शब्दांत सुनावले.
काय म्हणाले भरत दाभोळकर?
एयु बँकेच्या जाहिरातीमध्ये जे दाखवण्यात आले, त्यातील हिंदू धर्म, संस्कृती आणि धार्मिक प्रथा परंपरा हा भाग सोडा, पण जाहिरातीमागील उद्देश पाहता ही जाहिरात टाकाऊ आहे. कारण जाहिरातीमध्ये आपल्या उत्पादनाविषयी माहिती द्यायची असते, पण या बँकेच्या जाहिरातीमध्ये बँकेविषयी विशेष माहिती देण्यातच आली नाही. सामाजिक प्रथा बदलणे, काहीतरी क्रांती घडवून आणणे असा जाहिरातींचा उद्देश नसतो आणि असूही नाही. तुम्ही अशा प्रकारच्या जाहिरातीमधून काही रूढी बदलण्याचा प्रयत्न करता, त्यासाठी ४० सेकंद घालवण्यापेक्षा आणि १० सेकंद औपचारिकरीत्या बँकेविषयी बोलण्यापेक्षा त्यात अधिक वेळ बँकेविषयी बोलले पाहिजे होते. तुम्ही आमच्यासोबत का बँकिंग करावे, आम्ही तुम्हाला काय सुविधा देणार, हे ४० सेंकद सांगून १० सेकंद आमिर खान दाखवा. खरेतर आमिर खान आणि कियारा यांना घेऊन जाहिरात करणे म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करण्यासारखे आहे. हा अतिशय मूर्खपणा आहे. अन्यथा पूर्ण जाहिरातीत आमिरला बँकेविषयी बोलताना दाखवा, असे दाभोळकर म्हणाले.
(हेही वाचा वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या ‘सुमार’ द्वादशीवारांनी साहित्यक्षेत्र नासवले; भाजपाची टीका)
का वादात सापडली जाहिरात?
आमिर आणि कियारा यांच्या जाहिरातीत ते दोघेही नववधू आणि वराच्या वेशात दिसत आहेत. परंतु, कियाराऐवजी आमिरची पाठवणी होत आहे. आणि आमिर गृहप्रवेश करताना माप ओलांडून कियाराच्या घरी राहण्यासाठी येत आहे. या जाहिरातीमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना छेद देत नवे काहीतरी करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. मात्र नेटकऱ्यांना ही जाहिरात मुळीच पटली नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या या जाहिरातीला सोशल मीडियावर जोरदार विरोध होताना दिसत आहे. ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही आमिर आणि कियारावर निशाणा साधत त्यांना मूर्ख म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community