‘आरे’ मोजतेय अखेरच्या घटका!

150

सकस आणि गुणवत्तापूर्ण दुधासाठी परिचित असलेली ‘आरे’ अर्थात बृहन्मुंबई दूध योजना आता अखेरच्या घटका मोजू लागली आहे. दूध उत्पादकांनी पाठ फिरवल्याने दूध संकलन जवळपास ठप्प झाले असून, कुर्ला आणि वरळीपाठोपाठ आरे दुग्धशाळेतील दूध वितरण आणि सहउत्पादन निर्मिती बंद करण्यात आली आहे. ३ मार्च १९५१ रोजी गोरेगावमध्ये ‘आरे’ डेअरीची स्थापना करण्यात आली. तिची क्षमता जवळपास अडीच लाख लिटर इतकी होती. मुंबईची लोकसंख्या वाढू लागल्यामुळे पूरक दुधासाठी १९६३ मध्ये वरळी (साडेचार लाख लिटर क्षमता) आणि १९७५ मध्ये कुर्ला (चार लाख लिटर क्षमता) परिसरात दुग्धशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतला. शिवाय ‘आरे’ ब्रँडच्या स्टॉलची संख्याही १८०० पर्यंत वाढवण्यात आली.

‘आरे’ने जवळपास ५० वर्षे दूध उत्पादन क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. सरकारी रुग्णालये आणि आस्थापनांसह सर्वसामान्य मुंबईकरांना अल्प दरात सकस आणि गुणवत्तापूर्ण दूध पुरवणारी संस्था म्हणून विश्वासार्हताही कमावली. मात्र, खासगी दूध संघांनी या व्यवसायात उडी घेतल्यानंतर हळूहळू तिचा दबदबा कमी होऊ लागला. गेल्या काही वर्षांत तर सरकारी रुग्णालये वगळता अन्य ठिकाणी ‘आरे’चे दूध मिळणे दुरापास्त झाले. आता दूध वितरणच बंद केल्याने बृहन्मुंबई दूध योजना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

(हेही वाचा गुजरातमध्ये शाही इमाम म्हणतात, मुसलमानांनी एकजूट होऊन भाजपाला मतदान करू नये)

स्टॉलधारक अडचणीत, रुग्णांची गैरसोय

आरेच्या स्टॉलवरचा दूध पुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. शिवाय आरेचे दही, ताक, लस्सी अशा सहउत्पादनांचा पुरवठाही झालेला नाही. बृहन्मुंबई दूध योजनेच्या स्थापनेपासून आरे केंद्रधारक आरे दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यातील बहुतांशजण वयस्कर झाले असून, त्यांच्याकडे दुसरे उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. शिवाय रुग्णालयांना दूध पुरवण्यातही आरे असमर्थ ठरू लागल्याने रुग्ण आणि नवजात बालकांची मोठी गैरसोय होत आहे.

मोक्याच्या भुखंडांवर डोळा?

वरळी, कुर्ला आणि आरे या तिन्ही दुग्धशाळा मोक्याच्या जागी शेकडो एकरवर उभ्या आहेत. २०१६ मध्ये कुर्ला डेअरीचा विकास करण्यासाठी तत्कालीन सरकारने योजना आणली. तेव्हा ही डेअरी बंद करण्यात आली, ती आजतागायत खुली झालेली नाही. त्यानंतर ठाकरे सरकारने २०२१ मध्ये वरळी डेअरीच्या जागी जागतिक दर्जाचे मत्स्यालय बांधण्यासाठी ती बंद केली. आता आरे दुग्धशाळेचाही नंबर लागला आहे. त्यामुळे मोक्याच्या भुखंडांवर डोळा ठेवून हे प्रकल्प बंद पाडले जात आहेत का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

कारण काय?

  • आरेच्या दुधाची भिस्त ही प्रामुख्याने नागपूर, औरंगाबाद आणि कोकणातील दूध उत्पादकांवर आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत खासगी कंपन्यांच्या तुलनेत ‘आरे’कडून कमी दर मिळत असल्याने दूध उत्पादकांनी पाठ फिरवली आहे.
  • बिल मंजूर होण्याची प्रक्रियाही वेळकाढू असल्यामुळे पैसे खात्यात जमा होईपर्यंत बराच वेळ लागतो. याउलट खासगी कंपन्या व्यवहारात वेळकाढूपणा करीत नाहीत.
  • लम्पी प्रादुर्भावामुळे पशूधन संकटात आहे. त्याचा फटका महानंदसह आरेलाही बसला आहे. त्याव्यतिरिक्त सरकारी अनास्था हेही यामागील प्रमुख कारण असल्याचे एका अधिकाऱ्याने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.

(हेही वाचा मविआच्या काळात कौशल्य विकास केंद्राची जमीन ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला आंदण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.