Aarey Stall : आरे रे … कुर्ल्यातील स्टॉल आणून बसवला माटुंग्यात

2410
Aarey Stall : आरे रे … कुर्ल्यातील स्टॉल आणून बसवला माटुंग्यात

मुंबईमध्ये सध्या आरे सरीताचे स्टॉलना परवानगी दिली जात नसून यापूर्वी देण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये जर आरे दूधाची उत्पादने नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, असे असतानाच कुर्ला कल्पना सिनेमा जवळील एक आरेचा स्टॉल चक्क माटुंगा खालसा कॉलेजच्या मागील बाजूस रस्ता क्रमांक ३२ च्या पदपथावर बसवण्यात आला आहे. माटुंगा परिसर मोडणाऱ्या महापालिकेच्या एफ उत्तर विभागात यापूर्वी एकही आरेचा स्टॉल नव्हता, परंतु आता हा पदपथावरच बसवण्यात आला आहे. एका बाजूला फेरीवाला धोरण नसल्याने पदपथावर स्टॉल उभारण्यास परवानगी दिली जात नसताना शाळा परिसरातील पदपथावर या स्टॉलला परवानगी दिल्याने महापालिकेचे नक्की धोरण काय आणि महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावाखातर याला परवानगी देतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Aarey Stall)

महापालिकेच्या नोंदीत मुंबईत आरे सरीताचे केवळ ७ स्टॉल

मुंबईमध्ये आरे सरीताचे केवळ सात स्टॉलची नोंदणी ही महापालिकेच्या दप्तरी असून यामध्ये महापालिकेच्या जी उत्तर विभागात ४ आणि एच पश्चिम विभागात ३ स्टॉल्स आहेत. मात्र, मुंबई महापालिकेच्या एल विभागात एकही आरे सरीताचा स्टॉल नसतानाही कुर्ला एलबीएस मार्गावरील कल्पना सिनेमागृहाजवळील जागेवर आरे सरीता केंद्र समितीकडून वाटप झालेले आरे दूध केंद्र हे आता थेट माटुंगा पूर्व येथील खालसा कॉलेजच्या मागे रस्ता क्रमांक ३२ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथील पदपथ ही लोकांना चालण्यास अपुऱ्या असून त्यातच हा स्टॉल टाकण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांनी याला तीव्र विरोध केला आहे. (Aarey Stall)

(हेही वाचा – Tansa Lake : तुळशी तलावापाठोपाठ तानसा तलावही भरले)

कुर्ल्यात मिळाली नाही केंद्राला जागा

हे आरे दूध केंद्र ज्या ठिकाणी मंजूर झालेले होते, ते अन्य जागी स्थलांतरीत करण्यास संपूर्ण कुर्ला एल विभागाच्या हद्दीत कुठेही जागा नसल्याने इतर विभागांच्या हद्दीत स्थापित करावे असे एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी मातृदुग्धशाळा कुर्ला यांच्या प्रभारी व्यवस्थापकांना कळविले होते. त्यामुळे या केंद्रासाठी माटुंगा खालसा कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यांवरील पदपथाची निवड केली आहे. (Aarey Stall)

महापालिकेनेही व्यक्त केली भीती, तरीही…

या रस्त्यावरुन व्हीजेटीआय, आयसीसीट, डॉन बॉस्को, सेंट जोसेफ, खालसा व इतर संस्थांचे विद्यार्थी मोठ्याप्रमाणात या पदपथावरून ये-जा करतात. या रस्त्याच्या पदपथावर आरे केंद्र उभारण्यास परवानगी दिल्यास स्थानिक रहिवाशी संस्थांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी हे केंद्र उभारण्यास मातृदुग्धशाळा कुर्ला यांचे प्रभारी व्यवस्थापक यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. अशी स्पष्ट भूमिका एफ उत्तर विभागाने घेतली होती. त्यामुळे महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक अभियंत्यांनी तसेच सहायक आयुक्तांनी याला हे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्या सापेक्ष मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. (Aarey Stall)

(हेही वाचा – Dadar च्या गोल देवळासमोरच वाहते मलमिश्रित पाणी)

कुर्ला येथे मंजूर झालेला स्टॉल माटुंग्यात का?

याबाबत भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका नेहल शाह यांनी, याठिकाणी पदपथावर आरेचाच काय तर अन्य कोणताही स्टॉल उभारण्यास रहिवाशांचा विरोध असून मी सर्व रहिवाशांच्या मागणीसोबत असल्याचे सांगितले. एफ उत्तर विभागात एकही आरेचा स्टॉल नाही. मग कुर्ला येथे मंजूर झालेला स्टॉल माटुंग्यात का असा सवाल करत नेहल शाह यांनी पदपथावर कोणतेही स्टॉल उभारण्यास बंदी असून याबाबतचे फेरीवाला धोरणही अद्याप मंजूर नसताना आधी कुर्ला एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी त्यानंतर एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांनी हा प्रस्ताव परस्पर फेटाळला का नाही असा सवाल केला आहे. (Aarey Stall)

महापालिकेच्या आयुक्तांवर, अतिरिक्त आयुक्तांवर कुणाचा दबाव

आज एक आरेचा स्टॉल लागल्यानंतर उद्या बाकीचे फेरीवाले येतील, मग या स्टॉलच्या आडून दुसऱ्यांचे स्टॉल्स लागतील. त्यामुळे हा स्टॉल ताबडतोब काढून टाकण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रस्ता तसेच पदपथ खोदण्यास परवानगी नसते. विद्युत कंपनी किंवा जल विभागाला अत्यंत तातडीचे काम असेल तरच खोदण्यास परवानगी दिली जाते, तर मग या स्टॉलला वीज जोडणी देण्यासाठी पावसाळ्यात खोदकाम करून केबल टाकण्यास कशी परवानगी दिली आहे? महापालिकेच्या आयुक्तांवर, अतिरिक्त आयुक्तांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल शाह यांनी केला. (Aarey Stall)

या स्टॉलच्या आडून ही पदपथ अतिक्रमित केली जाईल

या परिसरात शाळा आणि कॉलेजेस असून त्या मुलांना पदपथावर सुरक्षित चालता यावे याकरता त्यांना मोकळ्या पदपथ ठेवणे आवश्यक आहेत, नाहीतर या स्टॉलच्या आडून ही पदपथ अतिक्रमित केली जाईल आणि लोकांना चालण्यास रस्त्यावरुन चालावे लागेल आणि यातून अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. (Aarey Stall)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.