आश्रय योजना : सांताकुझ, अंधेरी पश्चिममधील सफाई कामगार वसाहती पुनर्विकासात ३८१ सदनिका झाल्या कमी, पण खर्च वाढला ५९ कोटींनी

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतंर्गत आता अंधेरी पश्चिम येथील यारी रोड, ए.बी. नायर रोड, जुहू गल्ली तसेच सांताक्रुझ पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेनमधील वसाहतींचाही विकास करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. परंतु काम सुरु होण्यापूर्वीच या कामांचा कंत्राट सुमारे ५९ कोटींनी वाढला आहे. विविध करांसह ५६०.१६ कोटी रुपयांच्या तुलनेत हे कंत्राट आता ६१९.०२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या वाढीव अतिरिक्त खर्चाला प्रशासकांनी मंजुरी प्राप्त झाली आहे. आश्रय योजनेतील या कंत्राट कामांबाबत भाजपच्या नगरसेवकांनी शंका उपस्थित करत तक्रारी केल्यानंतरही याच्या वाढीव अतिरिक्त कामांच्या खर्चाला प्रशासकांनी मंजुरी देत भविष्यात समितीपुढे हा प्रस्ताव जाणार नाही याची काळजी घेतली आहे.

( हेही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीचे निकालाआधीच ठरले होते…; देवेंद्र फडणवीस यांची टीका)

सफाई कामगारांना चांगल्या सुसज्ज व हवेशीर, मोकळ्या जागेत राहता यावे साठी महापालिकेने कामगार वसाहतींचा पुनर्विकासांचे काम आश्रय योजनेतंर्गत हाती घेतले आहे. मुंबई एकूण सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून त्यातील ३६ वसाहतींचा पुनर्विकासा आश्रय योजनेतंर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गट ६मध्ये यारी रोड, ए.बी.नायर रोड, जुहू गल्ली, न्यू हसनाबाद लेन या भागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून ३०० चौरस फुटाच्या १८४४ तर ६०० चौरस फुटाच्या १४४ अशा स्वरुपाच्या एकूण १९८८ सदनिकांची बांधणी केली जाणार आहे. हे कंत्राट ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स या कंपनीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. मे २०२१ या सफाई कामगारांच्या पुनर्विकास प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जून २०२२ मध्ये यामध्ये सुमारे ५९ कोटी रुपयांचा अतिरिक्त होणार आहे. या अतिरिक्त खर्चाच्या वाढीव कंत्राट कामाला महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या वाढीव खर्चाला मान्यता देताना त्यामध्ये ३०० चौरस फुटांची १४६३ सदनिका बांधण्यात येणार असल्याचे नमुद केले. त्यामुळे ३८१ सदनिका या कमी झाल्या आहेत.

स्थायी समितीच्या सभेमध्ये आश्रय योजनेतील या प्रस्तावाला मंजुरी दिल्यांनतर भाजपने नियमबाह्य मंजुर करण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत तक्रार नोंदवली. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात न होताही वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे भविष्यात महापालिका स्थापन झाल्यानंतर स्थायी समितीमध्ये या वाढीव खर्चाला मान्यता मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासकांनी भविष्यातील भीती ओळखत या वाढीव खर्चाला मान्यता दिल्याचे बोलले जाते.

डिझाईन आणि बिल्ड टर्नकीच्या धर्तीवर महापालिकेच्या क्षेत्रफळावर कंत्राटदारामार्फत आराखडे, स्थापत्य, विद्युत, परिचालन व परिरक्षण या कामांसाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या वसाहतींचा जलदगतीने पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेतंर्गत पुर्व निर्मिती तंत्रज्ञान अर्थात प्रिहॅब टेक्नॉलॉजी वापरुन प्रायोगिक तत्वावर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती.

या कामाचे कंत्राट ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स या कंपनीला देण्यात आले. परंतु या कंपनीने आपल्या नावात सुधारणा करून ट्रान्सकॉन कंस्ट्रक्शन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या कंपनीच्या बदलेल्या नावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

अंधेरी पश्चिम यारी रोड

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ३२६ (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :२७० )
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००(प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :००० )

अंधेरी पश्चिम ए बी नायर रोड

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : १९६ (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका : १४१ )
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००(प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :००० )

अंधेरी पश्चिम जुहू गल्ली

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका :५६२, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :३९७ )
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ५८, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका : ८२ )

सांताक्रुझ पश्चिम न्यू हसनाबाद लेन

प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ७६०, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :६५५)
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ८६, (प्रत्यक्षात बांधल्या जाणाऱ्या सदनिका :८८ )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here