Zero Prescription Scheme च्या निविदा प्रक्रियेला बांगर निघाले गती द्यायला

520
Zero Prescription Scheme च्या निविदा प्रक्रियेला बांगर निघाले गती द्यायला

मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणारी औषधे बाहेरील मेडिकल दुकानांमधून खरेदी करावी लागू नये, यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण (Zero Prescription Scheme) राबविण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या स्तरावर सर्वंकष निविदा प्रक्रिया राबविण्यात येत औषध खरेदीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील पडताळणी प्रक्रिया वेगाने पार पडावी, येत्या ६ सप्टेंबरपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी व १५ सप्टेंबरपर्यंत ‘लेटर ऑफ इन्टेंट’ कोणत्याही परिस्थितीत देण्यात यावेत, असे सक्तीचे निर्देश महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मध्यवर्ती खरेदी खात्यासह रूग्णालय प्रशासनास दिले आहेत.

अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ योजनेच्या (Zero Prescription Scheme) अंमलबजावणीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना रुग्णालयातच मोफत औषधे उपलब्ध होणार आहेत. याबाबतची कार्यवाही संबंधित खात्यांद्वारे सुरू आहे. परंतु, ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊन नागरिकांना या धोरणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (१६ ऑगस्ट २०२४) रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.

(हेही वाचा – आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई; Ravindra Chavan यांनी दिले संकेत)

मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेत विविध सूचींअंतर्गत विविध औषधे व वैद्यकीय बाबींची पडताळणी प्रक्रिया सध्या मध्यवर्ती खरेदी खाते आणि बा.य.ल नायर रुग्णालय यांच्यामार्फत सुरू आहे. ही प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी आवश्यक असणारे वरिष्ठ फार्मासिस्ट, फार्मासिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर आदी अतिरिक्त मनुष्यबळ व या अतिरिक्त मनुष्यबळाला आवश्यक असणारे अतिरिक्त संगणकही तातडीने म्हणजे पुढच्याच दोन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आदेश बांगर यांनी या बैठकीत सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे यांना दिले आहेत.

वरीलनुसार उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाने सोमवार ते शनिवार दरम्यान मोहीम पद्धतीने त्यांना नेमून दिलेले काम पूर्ण करावयाचे आहे. हे काम करण्यासाठी कामाच्या प्रकारानुसार चमू तयार करून त्यांच्याद्वारे हे काम करवून घ्यावयाचे आहे. तसेच चमू प्रमुख व विभाग प्रमुख यांनी सर्व चमूंद्वारे करण्यात येणाऱ्या कामांचा दररोज आढावा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या सर्व कार्यवाहीसाठी तीन आठवड्यांची मुदत अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

(हेही वाचा – Kolkata doctor rape-murder case: कोलकाता हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद; डॉक्टरांचा संप, रुग्णसेवा ठप्प)

त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या चार रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया आता महत्त्वाच्या टप्प्यात व ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. याबाबत देखील सविस्तर चर्चा आजच्या बैठकीदरम्यान करण्यात आली. या निविदा प्रक्रियेला अधिक प्रतिसाद मिळावा व एकंदरीत मशीन खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यादृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य विभाग) यांना दिले. (Zero Prescription Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.