BMC : नालेसफाईच्या कामासाठी बांगर यांच्या सूचना म्हणाले; अभियंत्यांची कार्यालयात थांबून नव्हे, तर थेट प्रत्यक्षस्थळी जाऊन देखरेख हवी

131
BMC : नालेसफाईच्या कामासाठी बांगर यांच्या सूचना म्हणाले; अभियंत्यांची कार्यालयात थांबून नव्हे, तर थेट प्रत्यक्षस्थळी जाऊन देखरेख हवी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

येत्या ५१ दिवसांत म्हणजे ३१ मे २०२५ पर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण होण्यासाठी अतिशय दक्ष राहून पर्यवेक्षण करावे, कामाची गुणवत्ता व पारदर्शकता राहण्यासाठी गाळ उपसा कामांशी सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात थांबून कामांचा आढावा घेऊ नये, तर गाळ काढण्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून कामांवर योग्य देखरेख करणे अनिवार्य असेल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून प्रमुख नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या अनुषंगाने पूर्व उपनगरांमधील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी १० एप्रिल २०२५ रोजी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. या दौऱ्याप्रसंगी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – कागद विरहित भविष्यासाठी राज्याचे एक पाऊल पुढे; ‘E-Cabinet’ प्रणाली लागू करणार)

आजच्या दौऱ्यात घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहूल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला इत्यादी ठिकाणी बांगर यांनी भेट दिली. तसेच वांद्रे कुर्ला संकूल परिसरात भेट देऊन मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. प्रत्येक नाल्याच्या वरील आणि खालच्या बाजूस असलेले प्रवाह, नाल्यांच्या परिसरात जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, त्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना, या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन बांगर यांनी आवश्यक ते निर्देश दिले. (BMC)

(हेही वाचा – BEST उपक्रमाच्या विविध प्रश्नांवर आता तोडगा निघणार; कारण…)

सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीतून गाळ काढण्याचे एकूण उद्दिष्ट्य, त्यासाठी आवश्यक संयंत्रे, कालावधी आदींबाबत बांगर यांनी अधिकारी व अभियंते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प्रत्येक टप्प्यात किती गाळ काढणे अपेक्षित आहे, प्रत्येक टप्पा किती कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे, याचे सूक्ष्म नियोजन करावे. सर्व कामे विहित वेळेत व पारदर्शकतेसह पूर्ण करावीत. जिथे गाळ मोजला जातो त्या वजनकाट्यांच्या ठिकाणी पुरेशा संख्येने सीसीटीव्ही लावावेत. त्यांचा पुरेसा बॅकअप असावा. गाळ काढण्याच्या प्रत्येक सत्राचा अभिलेख (रेकॉर्ड) चोखपणे नोंदवावा. रात्री काम सुरू राहणार असेल तर त्यावेळी देखील अभियंत्यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश बांगर यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागाच्या हद्दीतून वाहणाऱ्या मिठी नदी प्रवाहाच्या ठिकाणी गाळ काढताना वन विभागासोबत योग्य समन्वय राखावा, अशी सूचनाही त्यांनी केली. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.