कोरोना काळात मागच्या एका वर्षात झालेल्या मृत्यूंमध्ये देशातील असंख्य बालकांनी आपले पालक गमावले आहेत. गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून देशातील सुमारे दीड लाख बालकांचे छत्र हरवले आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने ही माहिती न्यायालयात दिली आहे. पालक गमावलेली सर्वाधिक बालके ओडिसा आणि महाराष्ट्र राज्यात आहेत.
बालकांना मदतीची आणि संरक्षणाची गरज
1 एप्रिल 2021 पासून, देशातील 1 लाख 47 हजार 492 बालकांनी त्यांची आई किंवा वडिल किंवा दोघांनाही गमावले आहे, अशी माहिती बालहक्क संरक्षण आयोगाने दिली आहे. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी आयोगाच्या बालस्वराज्य पोर्टल कोविड केअर या संकेतस्थाळावर अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आयोगाने न्यायालयाकडे स्वत:हून ही माहिती सादर केली आहे.
या सर्व बालकांना मदतीची आणि संरक्षणाची गरज असल्याचे आयोगाने म्हटले आहे. अनाथ झालेल्यांपैकी 76 हजार 508 मुले असून, 70 हजार 980 मुली आहेत. पालक गमावलेल्या बालकांमध्ये आठ व तेरा वर्षांमधील मुलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांशी बालकांनी आई किंवा वडिल अशा एकालाच गमावले असल्याने ते सध्या किमान एका पालकांबरोबर सुरक्षित राहत आहेत.
( हेही वाचा :”नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे पुन्हा मातीशी नाळ जोडणार” )
ही बालके सध्या कोणाबरोबर
- 1 लाख 25 हजार 205 बालकं आपल्या आई किंवा वडिलांसोबत
- 11 हजार 272 बालकं कुटुंबीयांसोबत
- 8 हजार 450 नातेवाईकांकडे
- 1 हजार 529 बाल निवारागृहांमध्ये
- 19 निवारागृहांमध्ये
- 188 अनाथालयांमध्ये