सुमारे २ लाख तिरंगा ध्वज महापालिकेला झाले प्राप्त

134

मुंबई महापालकेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत ३६ लाख तिरंगा ध्वजाचे विनामुल्य वाटप केले जाणार असून त्यातील दोन लाख तिरंगा ध्वज महापालिकेला प्राप्त झाले आहे. या तिरंगा ध्वजांचे वाटप आता प्रत्येक विभाग कार्यालयांमधून होणार असून शिवाय महापालिकेच्या आरोग्य सेविकांसह सफाई कामगारांच्या माध्यमातूनही घरोघरी वाटप केले जाणार आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियान

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील राज्यभरात ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. या अनुषंगाने, व्यापार, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची तसेच स्वयंसहाय्यता गट, बचत गट आणि इतर क्षेत्रांमधील स्वयंसेवक अशी निरनिराळ्या घटकांची मदत घेवून सर्व स्तरावरील नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यासाठी जनजागृती केली. अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबे तथा घरे आणि इमारती यांची संख्या निश्चित करुन त्यानुसार ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२ लाख ध्वज महापालिकेला प्राप्त

त्यानुसार, मुंबई महापालिकेने ३६ लाख ध्वजांच्या खरेदीची प्रक्रिया राबवली असून त्याअंतर्गत २ लाख ध्वज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. टप्प्याटप्याने हे ध्वज प्राप्त होणार असून त्यानुसार प्रत्येक टप्यातील प्राप्त ध्वजांचे वितरण महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.