मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाल्याने महापालिका प्रशासनाने लागू केलेली १० टक्के पाणीकपात ०८ जुलै रोजी मागे घेण्यात आली. परंतु त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे मंगळवारी सकाळी पाणी साठ्यात वाढ होत एकूण ५० टक्के एवढा साठा झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडल्याने तलाव क्षेत्रातील साठ्यात वाढ होत असून मंगळवारी, १२ जुलै रोजी सकाळी सर्व तलाव आणि धरणामुळे ५०.३२ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
पाणी कपातीचा निर्णय रद्द
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने शुक्रवारी, ८ जुलै २०२२ पासून मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर (१ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर) इतका असावा लागतो. त्या तुलनेत शुक्रवारी, ८ जुलै रोजी ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर (३७ हजार ५५१ कोटी लिटर) म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध असल्याने हा कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हाता. तर शनिवारी, ४ लाख १८ हजार १२९ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा होता आणि मंगळवारी, १२ जुलै २०२२ रोजी ७ लाख २८ हजार २८६ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला होता.
१२ जुलैमधील मागील तीन वर्षांतील पाणी पातळी
- सन २०२२ : ७२ हजार ८२८ कोटी लिटर (एकूण साठ्याच्या ५०.३२ टक्के)
- सन २०२१ : २५ हजार २३२ कोटी लिटर (एकूण साठ्याच्या १७.४३ टक्के)
- सन २०२०: ३२ हजार ५११ कोटी लिटर (एकूण साठ्याच्या २२.४६टक्के)
सर्व तलाव आणि धरणांमधील एकूण साठा आणि सध्याचा साठा
- अप्पर वैतरणा : एकूण क्षमता : २२ हजार ७०६ कोटी लिटर ( सध्याचा पाणी साठा : ८ हजार ६९३ कोटी लिटर)
- मोडक सागर : एकूण क्षमता : १२ हजार ८९२ कोटी लिटर ( सध्याचा पाणी साठा :११ हजार ३१८ कोटी लिटर)
- तानसा : एकूण क्षमता : १४ हजार ५०८ कोटी लिटर (सध्याचा पाणी साठा : ०८हजार ४५५ कोटी लिटर)
- मध्य वैतरणा : एकूण क्षमता१९ हजार ३५३ कोटी लिटर ( सध्याचा पाणी साठा : ०२ ९ हजार १४५ कोटी लिटर)
- भातसा : एकूण क्षमता : ७१ हजार ७०३ कोटी लिटर ( सध्याचा पाणी साठा : ३३हजार २५२ कोटी लिटर)
- विहार : एकूण क्षमता : ०२हजार ७६९ कोटी लिटर (सध्याचा पाणी साठा : १ हजार ३९५ कोटी लिटर)
- तुळशी : एकूण क्षमता : ८०४ कोटी लिटर (सध्याचा पाणी साठा : ५६९ कोटी लिटर)