वातानुकूलित बेस्ट बसेसला आग लागण्याचे प्रकार सुरुच असून कांदिवली, गोराई यानंतर २२ फेब्रुवारी रोजी अंधेरी आगरकर चौक येथे बेस्टच्या ४१५ क्रमांकाच्या वातानुकुलित बसला सायंकाळी ६.५५ वाजता आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नसून ही आग सव्वा सात वाजता नियंत्रणात आली आहे.
बेस्टच्या बस क्रमांक ४१५ ही वातानुकूलित बस अंधेरी पूर्व येथील आगरकर चौक येथून सुटते. ही बस अंधेरीला प्रवाशांना घेऊन अंतिम स्थानक असलेल्या आगरकर चौक येथे आल्यानंतर सर्व प्रवाशी खाली उतरले आणि त्यानंतर या बसला आग लागण्याची घटना घडली. या आगीने मोठ्याप्रमाणात पेट घेऊन यामध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.
यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी कांदिवलीमध्ये वातानुकुलित बेस्ट बसला आग लागण्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर १२ डिसेंबर २०२२ रोजी बोरीवली गोराई येथे अशाच प्रकारे बेस्टच्या वातानुकुलित बसला आग लागण्याची दुसरी घटना घडली होती.
(हेही वाचा – औरंगाबादेत कार-दुचाकीत जोरदार धडक; दोघे जागीच ठार)
दरम्यान मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या टाटा सीएनजी बसेसमधील आगीच्या अलिकडील घटना घडणार नाही याची खात्री करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती आदींबाबतच्या सुधारणात्मक उपाययोजना करेपर्यंत या सर्व ४०० बसेस रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी बेस्टसाठी सार्वजनिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्ही त्याबाबत तडजोड करू शकत नाही. यामुळे वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात. प्रवाशांनी हे लक्षात ठेवावे. पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी ही बाब ठेवली पाहिजे.
Join Our WhatsApp Community