एसी लोकलने कर्मचाऱ्यांच्या नशिबी लेटमार्क!

93

मुंबईकरांना गारेगार प्रवासाची सुविधा देण्यासाठी वातानुकूलित रेल्वे गाड्या(एसी लोकल) सुरु करण्यात आल्या असून या रेल्वे गाड्यांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असल्याने टप्प्याटप्याने या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. रेल्वे लोकलच्या प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) वर्गातील प्रवाशांच्या मासिक पासाच्या रकमेपेक्षा एक हजार ते दीड हजार रुपये जास्त रुपये मोजले जात असले तरी प्रत्यक्षात या एसी लोकल वेळेत येत नसल्याने अनेक सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लेट मार्क लागला जात आहे. त्यामुळे एसी लोकलचा प्रवास म्हणजे विकतची डोकेदुखी असे म्हणण्याची वेळ आता या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आली आहे.

( हेही वाचा : बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन : जे ठाकरेंना जमले नाही ते शिंदे सरकार करून दाखवणार का?)

अधिक लोकल सोडण्याची मागणी 

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबर २०२१ पासून पहिली एसी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे, त्यानंतर मध्य रेल्वेवर १७ डिसेंबर २०२१पासून एसी लोकल सेवा सुरु झाली. या दोन्ही मार्गावरील एसी लोकलला कमी प्रतिसाद मिळत असल्याने तिकीट दरात निम्मी कपात करून दर आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु मासिक पासाच्या रकमेत मात्र कोणताही बदल केला नाही. तिकीट दर निम्मा केल्यामुळे एसी लोकलमधील गर्दी आता वाढू लागली असून आता गाड्यांच्या फेऱ्या वाढू लागल्याने अनेकांनी मासिक पासही काढले. त्यामुळे एसी लोकलला गर्दीच्या वेळी प्रचंड प्रतिसाद असून अधिक लोकल सोडण्याची मागणी होत आहे.

एसी लोकल वेळेवर येणे म्हणजे भाग्य

परंतु यासर्व एसी लोकल वेळेवर न धावणे हीच मोठी डोकेदुखी आता प्रवाशांची ठरली आहे. पश्चिम रेल्वे तसेच मध्य रेल्वेवर नियोजित वेळेपेक्षा उशिराने एसी लोकल धावत असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना कार्यालयीन वेळेत पोहोचता येत नाही. परिणामी त्यांना लेटमार्क सहन करावा लागत आहे. महापालिका मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली असा किंवा ठाणे असो एसी लोकल कधीही वेळेवर येत नाही. त्यामुळे कार्यालयात उशिरा पोहोचल्यानंतर पंचही उशिराने होतो. याचा परिणाम आपल्या हजेरीवर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर लोअर परळ येथील एका कार्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार एसी लोकल वेळेवर येणे म्हणजे एकप्रकारे आमचे भाग्य आम्ही ठरतो. पश्चिम रेल्वेवर वेळेवर लोकल आली असे कधीही होत नाही. तर मंत्रालयातील कर्मचाऱ्याने तर एसी लोकलचा पास आहे, पण वेळेत हजेरी नोंदवली जावी म्हणून आम्ही या लोकलची वाट न पाहता वेळेत आली तरच यातून प्रवास करतो, अन्यथा आपली नेहमीची गाडी पकडतो असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.