मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये वातानुकूलित रेल्वे गाड्या( एसी लोकल) सुरु करण्यात आली असली तरी आता या गाड्याही मोठ्याप्रमाणात गर्दी पहायला मिळत आहेत. परंतु ही गर्दी पासधारक आणि तिकीटधारक यांची नसून अधिक प्रमाणात सकाळी आणि रात्रीच्या वेळी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे एसी लोकलमधील ही गर्दी केवळ तिकीट तपासणीस (टीसी) यांच्या निष्काळजीपणामुळेच वाढत असल्याचे आता बोलले जात आहे.
( हेही वाचा : महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी देशभक्तीपर गीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम )
पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबर २०२१ पासून पहिली एसी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे, त्यानंतर मध्य रेल्वेवर १७ डिसेंबर २०२१पासून एसी लोकल सेवा सुरु झाली. या दोन्ही मार्गावरील एसी लोकलला कमी प्रतिसाद मिळत असल्याने तिकीट दरात निम्मी कपात करून दर आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु मासिक पासाच्या रकमेत मात्र कोणताही बदल केला नाही. तिकीट दर निम्मा केल्यामुळे एसी लोकलमधील गर्दी आता वाढू लागली असून आता गाड्यांच्या फेऱ्या वाढू लागल्याने अनेकांनी मासिक पासही काढले. त्यामुळे एसी लोकलला गर्दीच्या वेळी प्रचंड प्रतिसाद असून अधिक लोकल सोडण्याची मागणी होत आहे.
सुरुवातीला एसी लोकलमध्ये टीसींना अशाप्रकारे सज्ज ठेवण्यात आले होते की, विना तिकीट प्रवाशांना या लोकलमध्ये प्रवेश करण्याची आणि प्रवास करण्याची हिंमतही होत नव्हती. परंतु मागील काही महिन्यांपासून लोकलची गर्दी वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु लोकलमध्ये पासधारक आणि तिकीटधारक यांच्याऐवजी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचीच संख्या सकाळी आणि रात्रीच्या वेळी अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी लोकलमध्ये टीसी कायम असल्याने कोणीही प्रवेश न करणाऱ्या प्रवाशांची हिंमत आता सकाळी आणि रात्रीच्या वेळी टीसी येत नसल्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. टीसी हे केवळ सकाळी अकरा नंतर किंवा अंधेरी व दादरनंतरच दिसतात. परंतु विरारहून येणारे सर्व प्रवाशी हे आधी अंधेरीपर्यंत उतरुन जातात. त्यामुळे तिकीटधारकांना गर्दीतून प्रवास करावा लागते. तर दुपारच्या मधल्या वेळेत गाडीला गर्दी नसताना टीसी फेरफटका मारून तिकीट तपासत असल्याने मोजक्याच वेळेत टीसींचे दर्शन घडले जाते.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सकाळपासून जरी टीसी या लोकलमध्ये राहिल्यास जे पासधारक आणि तिकीटधारकांना व्यवस्थित गर्दीशिवाय प्रवास करता येईल. परंतु टीसी यावेळेत एसी लोकलमध्ये नसतात याची कल्पना असल्याने सध्या एसी लोकलची अवस्था फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच झाली आहे. जर फर्स्ट क्लासच्या पासाच्या तुलनेत एक हजार ते दीड हजार रुपये मोजले जात असताना रेल्वे प्रशासनाने त्यामध्ये प्रत्येक फेऱ्यांमध्ये टीसी कायम ठेवले जावे,अशीही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. विरारहुन सुटणाऱ्या सकाळच्या गाड्या आणि संध्याकाळी सहा नंतर सुटणाऱ्या प्रत्येक गाड्यांमध्ये टीसीचा दरारा संपल्याने गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. हीच परिस्थितीत ठाणे, डोंबिवली, कर्जत,कल्याण आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांबाबत एसी लोकलच्या प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे प्रशासनाने ठोस निर्णय घेत टीसींची सेवा कायम ठेवल्यास एसींमधील गर्दी कमी होईल,असेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community