या मार्गावरील एसी लोकल बंद होणार?

171

उन्हाळ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईत एसी लोकल सुरू करण्यात आल्या परंतु एसी लोकलच्या तिकीटांचे दर अधिक असल्याने या लोकलमधून जास्त लोक प्रवास करत नव्हते. परिणामी काही दिवसांपूर्वी एसी लोकलच्या तिकिटांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही हार्बर मार्गांवरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही हे पाहून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जातील.

( हेही वाचा : कन्फर्म तिकीटसाठी आता एजंटची गरज नाही! IRCTC ने दिल्या काही खास टिप्स )

एसी लोकल फेऱ्या बंद 

मे महिन्यात ८ तारखेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून रोज सरासरी २८ हजार १४१ प्रवाशांनी प्रवास केला. यातील मुख्य मार्गावरील प्रवासी संख्या २४ हजार ८४२ होती तर हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या ३ हजार २९९ होती. तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत जवळपास ६० टक्के वाढ झाली. मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकलचा वाढता प्रतिसाद पाहून सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी सुद्धा एसी ट्रेन चालवण्यात येतील असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकलला प्रतिसाद नसल्याने या मार्गावरील एसी लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी ट्रेनपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य गाड्या सोडण्यात आल्या.

हार्बर मार्गावर पास काढलेल्या प्रवाशांचे काय?

प्रवासी प्रतिसाद देत नसल्याने हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावर ज्या प्रवाशांनी अगोदरच पास काढला आहे त्यांचे काय होणार याबाबत रेल्वेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.