-
प्रतिनिधी
मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देताना ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या दुहेरी रस्ता बोगदा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत विकसित होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासह प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे या प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “हा प्रकल्प पी. डी’मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग तसेच अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून, टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण आणि पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत.”
(हेही वाचा – 26/11 Attack : दिग्विजय सिंह आता कुठे आहेत? समाजमाध्यमांवर विचारला जातोय प्रश्न)
प्रकल्पाला गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन
मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला असून, एस. व्ही. पटेल रस्ता आणि मरीन ड्राईव्ह येथे आवश्यक सुधारणा आणि विस्तारीकरणाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. “या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषणात घट
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. याशिवाय, प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. “हा प्रकल्प दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आहे. यामुळे शहराच्या आर्थिक आणि भौगोलिक विकासाला गती मिळेल,” असे फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – BMC : हवामानाच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता, त्या-त्या वेळी अधिकारी कार्यस्थळी हजर हवेत; आयुक्तांच्या सूचना)
मुंबईच्या विकासाला नवी दिशा
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा हा दुहेरी बोगदा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सध्या प्रगतीपथावर असलेली प्रारंभिक कामे आणि कालबद्ध नियोजन यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी लवकरच वास्तवात येण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून येणार असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community