एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला पुणे-नाशिक रोडवर भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बसने महावितरणच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली असून त्यामुळे अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या या जमिनीच्या दिशेने झुकल्या आहेत. या बसने रिक्षालाही धडक दिल्याने रिक्षाचालकासह चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्य म्हणजे या बसचे अॅक्सिलेटर चक्क एका दोरीने बांधलेले होते आणि ब्रेकजवळ दगड ठेवले असल्याचे आढळून आले आहे.
विजेच्या खांबाला धडक
नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी शिवशाही बस एम एच 09 ई एम 1297 ही महामार्गावरुन जात होती. दुपारच्या सुमारास नाशिक रोडजवळील पासपोर्ट कार्यालयासमोर शिखरेवाडी चौकात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकली आणि खांबावर चढली. याठिकाणी थांबलेल्या रिक्षेलाही बसची मागून धडक बसली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
(हेही वाचाः ‘सेवा विवेक’च्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक)
…तर बसला आग लागली असती
दरम्यान, या बसमध्ये ब्रेकडवळ दगड आणि दोरी लावलेला अॅक्सिलेटर आढळल्यामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विजेच्या खांबावर धडकल्यानंतर जर का विजेच्या तारा या बसवर कोसळल्या असत्या तर या बसला आग लागण्याची शक्यता होती, असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community