केईएम रुग्णालयाच्या शिकाऊ नर्सेसची राहण्याची व्यवस्था टीबी रुग्णालयात

192

केईएम रुग्णालयातील शिकाऊ नर्सेसच्या परळ येथील वसतिगृह अतिधोकादायक बनल्याने याठिकाणी राहणाऱ्या ३०० नर्सेसची पर्यायी व्यवस्था आता शिवडीतील टिबी रुग्णालयातील एका वॉर्डामध्ये वसतिगृह बनवून त्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केईएम रुग्णालयासमोरील आठ मजली इमारत डॉक्टरांनी अडवून ठेवली आहे. नर्सेससाठी बांधलेल्या वसतिगृहाच्या इमारती डॉक्टरांनी अडवून ठेवल्या असताना तिथून डॉक्टरांना बाहेर काढून नर्सेसना त्यांचे हक्काची निवासाची जागा देण्याऐवजी या शिकाऊ नर्सेसना टीबी रुग्णालयात हलवले जात आहे. त्यामुळे टीबी रुग्णाची लागण होण्याची भीती वर्तवली जात असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचीही भीती वर्तवली जात आहे.

bmc

( हेही वाचा : सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा )

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता निवासस्थानाशेजारी नर्सेसची वसाहत असून ही वसाहत इमारत १०० जुनी असल्याने ते अतिधोकादायक बनली आहे. या वसतीगृहाचे स्लॅब ४ नोव्हेंबर रोजी कोसळून वसतिगृहात स्वयंपाक बनवण्याचे काम करणाऱ्या संगीता चव्हाण या महिला गंभीर जखमी झाल्या. हा स्लॅबचा काही भाग थेट त्यांच्या डोक्यावर कोसळून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या ३०० शिकाऊ परिचारिकांच्या पर्यायी राहण्याची व्यवस्था शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात केली जात आहे. या रुग्णालयातील एका वॉर्डामध्ये वसतीगृह बनवले जात असून क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या संसर्गजन्य आजाराचे निदान करणाऱ्या रुग्णालयांमध्ये शिकाऊ नर्सेसची राहण्याची व्यवस्था केल्याने त्यांचा या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे.

काही वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयातील नर्सेसची लागण होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. यामध्ये काही नर्सेसचाही मृत्यू झाला होता. या घटनांमधून शिकून सुधारणा करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून शिकाऊ नर्सेसना टी.बीच्या आजाराची लागण व्हावी यासाठीच प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत स्वरक्षणी महिला हितवर्धक संस्थेचे अध्यक्षा रचना अग्रवाल या सातत्याने या शिकाऊ नर्सेसच्या टी बी रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये केल्या जाणाऱ्या निवास व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत याठिकाणी वसतिगृह करण्यास तीव्र विरोध केला आहे. या सर्व शिकाऊ मुली वयाने छोट्या आहेत. पालकांनी मोठ्या विश्वासाने इथे दाखल केले असून त्या मुलांची काळजी घेणे हे महापालिका रुग्णालय व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. विशेष म्हणजे केईएम रुग्णालयासमोर नर्सेसच्या वसतिगृहासाठी आठ मजली अँकर इमारत काही वर्षांपूर्वी बांधली आहे. परंतु याठिकाणी नर्सेसना राहायला न देता डॉक्टरांनी या जागा अडवून ठेवल्या आहेत. तत्कालिन केईएमचे अधिष्ठाता डॉ संजय ओक यांनी त्यावेळी डॉक्टरांची व्यवस्था दुसऱ्या जागेत करून नर्सेसना त्यांचा जागा दिल्या जातील ,असे आश्वासन दिले होते. परंतु ओक यांच्यानंतर डॉ अविनाश सुपे, हेमंत देशमुख येऊन गेले तरी या डॉक्टरांनी जागा खाली केल्या नाहीत. त्यामुळे येथील डॉक्टरांची व्यवस्था अन्य ठिकाणी करून याठिकाणी नर्सेसच्या वसतिगृहाची व्यवस्था केली जावी अशी मागणी रचना अग्रवाल यांनी केली आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयामध्ये किचनची व्यवस्था नसून प्रसाधनगृहांचीही सुविधा नाही. तिथे या नर्सेस कशाप्रकारे तिथे राहतील असा सवाल त्यांनी केला आहे. यापूर्वी एलफिन्स्टन रोड येथील इमारतही डॉक्टरांनी अडवून ठेवली आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयासमोरील आठ मजली अँकर इमारत ही नर्सेसना उपलब्ध करून दिल्यास त्यांना रुग्णालयात सहज पोहोचता येईल,असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केईएम रुग्णालयाच्या शिकाऊ नर्सेसच्या वसतिगृहाची इमारत धोकादायक बनल्याने त्यांचे पर्यायी व्यवस्था शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या परिसरात केली जात आहे. याठिकाणी सर्व सेवा सुविधा आहे असून तिथे विशेष काळजीही घेतली जाणार आहे. याठिकाणी डॉक्टर आणि नर्सेसही राहत आहे. त्यामुळे याला विरोध असण्याचेही काही कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.