राज्यात वैद्यकीय सेवा पुरवताना अडथळा येऊ नये तसेच प्रत्येक राज्यात एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या हेतू खातर पहिल्या टप्प्यात नऊ वैद्यकीय महाविद्यालये वेगवेगळ्या जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहेत. पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशीम, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली येथेही नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातील. या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांवर प्रभारी अधिष्ठात्यांची नेमणूक करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
प्राध्यापकांची प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती –
मुंबईच्या जे जे महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अश्विनी जाधव यांची नियुक्ती ठाणे अंबरनाथ येथील सरकारी रुग्णालयात केली आहे. याच विभागातील प्राध्यापक डॉ. दीपक जोशी यांची नियुक्ती पालघर येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती जालन्यातील सरकारी रुग्णालयात तर, जळगावमधील सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वैभव सोनार यांची नियुक्ती बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात तर, अकोला येथील सरकारी रुग्णालयातील शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. गजानन आत्राम यांची नियुक्ती वाशीम येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Govt Employee : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदल करण्याचा विचार नाही, केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही)
गोंदिया येथील शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अभय हातेकर जोशी यांची नियुक्ती भंडारा येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे. गडचिरोली येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयच्या शरीरक्रियाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अविनाश टेकाळे काम पाहतील. अमरावती आणि वर्धा येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून अनुक्रमे यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिल बात्रा आणि नागपूर येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचे शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एन. वाय. कामडी काम पाहतील.
प्रभारी अधिष्ठात्यांची कामे
– शंभर विद्यार्थी क्षमतेच्या नवीन महाविद्यालयाची स्थापना करणे, त्याच्याशी संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणे.
– महाविद्यालयाची वाटप झालेली जागा ताब्यात घेणे.
– सरकारकडून तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून आवश्यक परवानग्या घेणे.
– वसतीगृह उभारणे.
Join Our WhatsApp Community