शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील अनेक सहयोगी संस्था अहोरात्र मेहनत करीत असतात. त्यांचा सहयोग लाभल्यामुळेच शिवराज्याभिषेक समितीला सर्व नियोजन करण्यास सुलभता प्राप्त होत. यासाठी राज्याभिषेक झाल्यानंतर, राज्याभिषेक करण्यास योगदान असणाऱ्या अशा सहयोगी संस्था आणि त्यांच्या सदस्यांचा सन्मान समिती दरवर्षी करत असते. यंदाच्या वर्षीही हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी इतिहासातील विविध विषयांवर सुमारे ३५ च्या वर पुस्तके ज्यांनी लिहिली असे ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते ‘शिव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२८ जुलै रोजी होणार कार्यक्रम
यंदा हा सन्मान सोहळा रविवार, २८ जुलै २०२४ रोजी, सकाळी ९ ते १२ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (पश्चिम) येथे आयोजित केला आहे. श्री शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी मंत्री मुनगंटीवार यांना मंत्रालयात प्रत्यक्ष या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले. मंत्री मुनगंटीवार यांनी हे निमंत्रण स्वीकारले. महाराष्ट्रातून या सोहळ्यास कानाकोपऱ्यातून इतिहासप्रेमी येणार आहेत. गेली ३० वर्षे श्री शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडी, लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडतो. आपल्यासारखे दूरदृष्टी लाभलेले, खंबीर सांस्कृतिक मंत्री या महाराष्ट्राला लाभले म्हणूनच या सोहळ्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. यासाठी समितीच्या वतीने आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत, असे सुनील पवार यावेळी मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना म्हणाले.
Join Our WhatsApp Community