अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांची घेतली ‘या’ कारणासाठी भेट!

134

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वायू, ध्वनी व जलप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती, पर्यावरण सदिच्छा दूत तथा प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह पर्यावरण विषयक स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) प्रतिनिधींनी जाणून घेतली. त्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांची मुंबई महानगरपालिका मुख्यालयात या भेट घेतली. यावेळी दिया मिर्झा यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका, आयआयटी, नीरी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, बांधकाम व्यावसायिकांची संघटना, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, वाहतूक नियंत्रण विभाग यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

प्रदूषणाचा प्रश्न संपूर्ण जगात ज्वलंत असून त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी ठरण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून त्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सदिच्छादूत, सिने अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह भेटीला आलेल्या शिष्टमंडळास केले.

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सदिच्छादूत या नात्याने दिया मिर्झा शिष्टमंडळाच्या वतीने बोलतांना म्हणाल्या की, प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने विभाग स्तरीय कार्यशाळा आयोजित कराव्यात. जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे प्रदूषण नियंत्रणाची गरज, त्यासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम याबाबत अवगत करावे, जेणेकरुन भावी पिढी सजग होवून लोकसहभाग वाढण्यास मदत होईल, असे दिया मिर्झा यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच तत्काळ प्रभावाच्या दृष्टीने अल्पकालीन व भविष्याची गरज लक्षात घेवून दीर्घकालीन अशा दोन्ही स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली जात आहे. यासंबंधातील सर्व भागधारक घटकांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल. मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा / राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० मेट्रिक टन प्रतिदिन एवढ्या क्षमतेचे दोन बांधकाम व पाडकाम (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डिमोलिशन वेस्ट) प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा उभारली जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा उपयोग करुन हवा प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई महानगराच्या विविध पाच भागात हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मिळून नागरी वनांच्या माध्यमातून आजवर चार लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम (एनकॅप) मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या सर्व प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांनी, विविध सामाजिक संस्था, बिगर शासकीय संघटनांनी एकत्रित येवून काम केले पाहिजे, असेही अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी अखेरीस नमूद केले.

या शिष्टमंडळात आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली, वातावरण फाऊंडेशनच्या श्रृती पांचाळ, रसिका नाचणकर, बीईएजी संस्थेच्या हेमा रमाणी, कार्टर क्लिनअप संस्थेच्या फ्रेशिया बी, एकसाथ फाऊंडेशनचे आश्विन माळवदे आदी सहभागी झाले होते होते. तर बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे, सुनील सरदार आदी मान्यवर देखील याप्रसंगी उपस्थित होते.

(हेही वाचा – महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्याची शताब्दी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.