-
ऋजुता लुकतुके
अदानी उद्योगसमुह देशातील काही बँकांच्या गटाकडून साडे तीन अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली तर आशिया खंडातील हे सगळ्यात मोठं कर्ज असेल. अदानी समुह पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि यावेळी आधीचं कर्ज फेडण्यासाठी त्यांना नवीन कर्ज किंवा कर्जाची पुनर्रचना करून हवी आहे. त्यासाठी ते देशातील बँका आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करत आहेत. पण, नवीन कर्जाची रक्कम ऐकतील तर तुम्हीही थक्क व्हाल. अदानी समुहाला तब्बल साडे तीन अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज हवं आहे.
अंबुजा सिमेंट्स कंपनी विकत घेण्याचा करार गेल्यावर्षी कंपनीने केला होता. त्यासाठी स्टेट बँकच्या अधिपत्याखाली एका बँकांच्या गटाकडून त्यांनी कर्जही घेतलं होतं. आता या कर्जाची पुनर्रचना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजेच कमी व्याजाचं कर्ज त्यांना हवं आहे. बँकांची या कर्जासाठी संमतीही असल्याचं मिंट या वृत्तपत्राने म्हटलं आहे. नवीन कर्ज घेण्यापूर्वी अदानी समुह मूळ कर्जातील ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम आधी फेडणार आहेत. मग त्यांना नवीन कर्ज मंजूर होईल, असं सांगितलं जात आहे. अंबुजा सिमेंट्स कंपनीच्या अधिग्रहणासाठी घेतलेलं मूळ कर्ज हे ३.८ अब्ज अमेरिकन डॉलरचं होतं. हे कर्ज घेतल्या नंतर लगेचच अदानी समुहाने त्याच्या पुनर्रचनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. आता काही महिन्यांनंतर नवीन करार प्रत्यक्षात येत असल्याचं दिसतंय.
(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : मैदान आणि उद्यानाबाबत नव्या धोरणावर होणार चर्चा : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बोलावली बैठक)
बँकांच्या नवीन गटात डीबीएस ग्रुप होल्डिंग्ज, आबुधाबी बँक, मिझूहो फायनान्शिअल ग्रुप, मित्सुबिशी फायनान्शियल ग्रुप तसंच सुमिटोमो बँक या वित्तीय संस्था प्रत्येकी ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज अदानी समुहाला देणार आहेत. ही बातमी अदानी समुहासाठी दिलासादायक असेल. कारण, हिंडेनबर्ग अहवालानंतर कंपनीचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं असताना आणि त्यानंतर कंपनीबद्दल आर्थिक अनिश्चिचतेचं वातावरण असताना, आंतरराष्ट्रीय बँकांचा समुह कंपनीला कर्ज देण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे अदानी समुहाचे व्यवहार आता पुन्हा पूर्ववत होत असल्याचं हे चिन्ह मानलं जात आहे. अदानी समुहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले असले तरी अहवाल प्रकाशित झाल्यापासून कंपनीचे शेअर घसरल्यामुळे कंपनीचं बाजारमूल्य १५० अब्ज अमेरिकन डॉलरनी कमी झालं आहे. त्यानंतर अदानी एंटरप्राइजेजस या समुहातील मुख्य कंपनीने अलीकडे जून महिन्यात बाँड मार्केटमधून १५ अब्ज रुपये उभे केले होते. त्यानंतर ही कर्ज संमतीची बातमी आल्यामुळे अदानी समुहात सकारात्मक वातावरण पसरलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community