मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख आता लवकरच जाहीर होणार असून यापुढील पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षकांना प्रत्येकी १० हजार रुपयाच्या बक्षिसात वाढ करुन आता ११ हजार रुपये एवढी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ईसीएसद्वारे जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सेवा निवृत्तीला सहा महिने शिल्लक असतानाही या पुरस्कारासाठी शिक्षक आता अर्ज करू शकतात, अशाप्रकारचाही निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
( हेही वाचा : विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड! सचिनलाही टाकले मागे, श्रीलंकेविरुद्ध कोहलीचे ४५ वे शतक )
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने एकूणा ५० शिक्षकांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या सर्व महापौर शिक्षक पुरस्कार विजेत्यांची नावे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने” महानगरपालिकेच्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
या पुरस्कार विजेत्या ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार (ECS द्वारे बँकेत जमा), मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व फेटा देऊन गौरवण्यात येते. परंतु पुरस्कार स्वरुपात दिल्या जाणाऱ्या रकमेत एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून यंदापासून या शिक्षकांना प्रत्येकी ११ हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या १९९६-९७ला सुरुवात झालेल्या पुरस्काराकरता निवड झालेल्या शिक्षकांना दोन हजार रुपयांवरुन तीन हजार एवढी रक्कम देण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. त्यानंतर २००५-०६मध्ये पुरस्काराच्या धनादेशाची रक्कम ३ हजारांवरुन ५ हजार एवढी करण्यात आली आणि त्यानंतर २०१०-११पासून पुरस्काच्या धनादेशाची रक्कम पाच हजारांवरुन दहा हजार एवढी वाढवण्यात आली होती. महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी पुढाकार घेत पुरस्काराच्या या रकमेत एक हजारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याला प्रशासकांचीही मान्यता मिळाली आहे.
सन २०११मध्ये केलेल्या ठरावानुसार या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराच्या निवडीच्या निकषामध्ये सेवा निवृत्तीच्या जवळ आलेल्या शिक्षकांना पुरस्कार देण्यापेक्षा ज्यांच्या सेवा निवृत्तीस ३ ते ४ वर्षे शिल्लक असतील अशा अर्जदारांना पुरस्कार देण्यात यावा अशी अट होती, परंतु आता या निकषामध्ये सहा महिने कालावधी शिल्लक असलेल्या अर्जदारांनाही निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्याची माजी महापौरांनी केलेली सूचना मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी सेवा निवृत्तीला सहा महिने शिल्लक असणारे शिक्षकही अर्ज करू शकतात. त्यामुळे सन २०२२-२०२३च्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी दोन महत्वपूर्ण निर्णय प्रशासकांच्या मंजुरीने शिक्षण विभागाने घेतल्याने आगामी पुरस्कार विजेत्यांना एक हजार रुपयांची वाढ मिळणार आहे, शिवाय निवृत्तीला सहा महिने शिल्लक असणारे शिक्षकही आता या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
सन २०२१-२२ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करून तीन महिने उलटून गेले तरी या शिक्षकांना या पुरस्काराचे वितरण होऊ शकले नाही. शिक्षण विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त दिर्घकाळ सुट्टीवर असल्याने याची तारीख निश्चित झाली नव्हती, परंतु आता त्या सेवेत रुजू झाल्याने लवकरच या पुरस्कार वितरणाच्या समारंभाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.