माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या अतिरिक्त बसेसची सुविधा

133

यंदा गोविंदासह गणेशोत्सव कोविड निर्बंधमुक्त साजरा झाल्यानंतर आता वांद्रयातील प्रसिध्द असलेली माऊंट मेरीची जत्राही उत्साहात पार पडली जाणार आहे. या जत्रेचे आयोजन येत्या ११ ते १८ सप्टेंबर २०२२ दरम्यान करण्यात येत असून वांद्रे रेल्वे स्टेशन पश्चिम ते माऊंट मेरी चर्च दरम्यान बेस्टच्यावतीने अतिरिक्त बसेसची व्यवस्था उपक्रमाच्यावतीने करण्यात आली आहे.

( हेही वाचा : चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनला अटलबिहारी वाजपेयींचे नाव, २५ डिसेंबरला होणार लोकार्पण)

बेस्ट उपक्रमाकडून २६० अतिरिक्त बसेस

शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या जुन्या माऊंट मेरी बेसलिका चर्चतर्फे दरवर्षी जत्रेचे आयोजन करण्यात येते आणि या जत्रेला मुंबईतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या जत्रेसाठी सर्व धर्माचे लोक आवर्जून येत असतात. या जत्रेत मेणबत्ती, फुले, खाद्यपदार्थ, चणे फुटाण्याचा प्रसाद आदींची सुमारे ३५० ते ४०० तात्पुरती दुकाने उभारली जातात. या जत्रेमुळे एकप्रकारे वांद्रे परिसराला जत्रेला स्वरुप आल्याचे पहायला मिळते. या जत्रेच्या कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी येत असल्याने वांद्रे स्टेशन पश्चिम ते माऊंट मेरी चर्च अशी ये- जा करणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून २६० अतिरिक्त बसेस या बसमार्ग क्रमांक २०२ मर्या., ३२६ मर्या., ए-३७५, ४२२ सी-७१ या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या बसगाड्या वांद्रे आणि माहिम विभागांशी संलग्न असतील. या व्यतिरिक्त उपनगरातून वांद्रे स्टेशनकडे येणा-या प्रवाशांसाठी जत्रेच्या कालावधीत ८ दिवस विशेष बससेवा वांद्रे स्टेशन व हिलरोड गार्डनच्या दरम्यान चालविली जाणार असल्याचेही उपक्रमाने स्पष्ट केले आहे. वांद्रे स्टेशन आणि हिलरोड गार्डन येथे विशेष बसेस मोठ्या प्रमाणात वेळोवेळी उपलब्ध होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.