कोकण रेल्वे गाड्यांना जोडले जाणार अतिरिक्त डबे

133

कोकण रेल्वेमार्गावरून दिवसा तसेच रात्री अशा दोन्ही वेळेत धावणाऱ्या डबलडेकर एक्स्प्रेसचे डबे जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर विविध स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने या वातानुकूलित दुमजली गाड्यांना चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )

एक्स्प्रेसच्या गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी डबलडेकर एक्स्प्रेस आता १२ ऐवजी १६ डब्यांची असणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्यांना गर्दी वाढताना दिसत आहे. कोरोनाची बंधने शिथिल झाल्यामुळे रेल्वेगाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होत असून वाढत्या प्रवासीसंख्येमुळे कोकण रेल्वेमार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित डबलडेकर एक्स्प्रेसच्या गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवास होणार गारेगार

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव द्विसाप्ताहिक डबलडेकरला २८ एप्रिलपासून २ जूनपर्यंत तर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस धावणाऱ्या डबलडेकर एकस्प्रेसला २९ एप्रिलपासून ३ जूनपर्यंत थ्री टायर एसी श्रेणीचे चार अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. याच मार्गावर मुंबईतून रात्री सुटणाऱ्या साप्ताहिक डबलडेकर एक्स्प्रेसला ३० एप्रिलपासून ४ जूनपर्यंत तर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक डबलडेकर एक्स्प्रेसला १ मे ते ५ जून या कालाधवीसाठी थ्री टायर एसी श्रेणीचे चार डबे जोडले जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.