शहर भागात विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून ग्राहकांची लूट केली जात असून सर्व विद्युत ग्राहकांकडून दोन महिन्यांच्या बिलांची अतिरिक्त अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे या अतिरिक्त अनामत रक्कम आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये या निर्णयाला स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
( हेही वाचा : गडचिरोलीत स्कूल बसचा भीषण अपघात! अनेक विद्यार्थी जखमी)
मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाने परिपत्रक जारी करून ग्राहकांकडून दोन महिन्यांच्या देयकांची रक्कम अनामत रक्कम म्हणून आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकार परिषद घेऊन या परिवहन विभागाचा तोटा भरुन काढण्यासाठी अशाप्रकारची अनामत रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अशाप्रकारची अनामत रक्कम आकारायची असेल तर अधिनियमांमध्ये तरतूद करायला हवी. परंतु अशाप्रकाची कोणतीही सुधारणा न करता १० लाख ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बेस्टचे शहरातील सर्व वीज ग्राहक हे अल्प, मध्यमवर्गीय आणि वाणिज्य गटातील असून त्यांनी गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालावधीत खूपच आर्थिक त्रास सहन केला आहे. यामधील काही विद्युत ग्राहकाची कोविडपासून आर्थिक स्थिती अंत्यत हलाखीची होती. अनेक विद्युत ग्राहकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना अशाप्रकारे दोन महिन्यांच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम बेस्ट प्रशासन मागत आहे, हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमईआरसीने याबाबतचा निर्णय २०२१मध्ये घेतला आणि त्यांची अंमलबजावणी बेस्ट प्रशासन दीड वर्षांनी करत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयाला ताबडतोब स्थगिती देण्याची मागणी राजा यांनी केली आहे.
मुंबईमध्ये बेस्ट उपक्रम, अदानी इलेक्ट्रीक आणि एमएसईबी या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या असून दोन्ही कंपन्यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला नाही.त्यामुळे प्रशासन वीज ग्राहकांना वेठीस धरत आहे. सर्वोच्च न्यायालयाने टीडीएलआर घेण्याचा निर्णय २०१७पर्यंत थांबवला आहे व त्याबाबतचा निर्णय रद्द केला आहे. तो खटला अजून न्यायालयात स्थगित असून त्यामुळे बेस्ट उपक्रम अनामत रक्कम वाढण्याचा निर्णय घेऊ शकत नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महिन्यामध्ये जर प्रशासनाने या निर्णयाला स्थगिती न दिल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन मुंबईत केले जाईल असा इशारा राजा यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community