राज्यात गोवरचा उद्रेक वाढत असल्याचे संकेत मिळत असल्याने आता नऊ महिन्यांहून कमी वयोगटाच्या नवजात बालकांना गोवर प्रतिबंधात्मक अतिरिक्त डोस दिला जाणार आहे. गोवरचा उद्रेक झाल्यापासून नऊ महिन्यांखालील ७२ टक्के नवजात बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने आता राज्यात सर्वच भागांत सहा ते नऊ महिन्यांखालील नवजात बालकांना गोवर प्रतिबंधात्मक अतिरिक्त लसीकरण देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी राज्य गोवर टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत घेतला. लसीकरणाच्या मागणीसाठी आरोग्य विभाग लवकरच केंद्राला पत्र लिहिणार आहे.
गोवरचा उद्रेक झालेल्या भागांत अद्याप लसीकरणासाठी काही समूदायांकडून नकार मिळत आहे. मुंबई, मालेगाव आणि अकोला या प्रमुख भागांत लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबाबत गोवर टास्क फोर्सच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या भागांसह गोवर उद्रेक झालेल्या ठाणे, अमरावती आदी भागांत प्रामुख्याने सहा ते नऊ महिन्यांमधील नवजात बालकांना सुरुवातीला अतिरिक्त गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण दिले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर भागांतही लसीकरणाला सुरुवात होईल. लसीकरणाची मोहीम व्यापक स्तरावर राबवली जाणार असल्याने अपेक्षित गोवर डोसची संख्या तसेच स्वतंत्र गोवर तपासणी प्रयोगशाळांच्या मुद्द्यांवर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्हास्तरावर आवश्यक लसीकरणाच्या संख्येची नेमकी माहिती देण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केल्या. गोवरबाबतीत पालिका अधिकारी तसेच जिल्हाधिका-यांनाही अद्ययावत संख्येची माहिती देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Communityराज्यात गोवरचा उद्रेक मार्च महिन्यापर्यंत सुरु राहण्याची भीती आहे. मात्र गोवरचा उद्रेक आटोक्यात येण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्वतःहून पुढाकार घेत सर्व स्तरांवर सुरु असलेल्या कामकाजाची स्वतःहून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आरोग्यमंत्री स्वतःहून जातीने कामकाजात लक्ष घालत असल्याने गोवर नियंत्रणात आणण्याचा आरोग्य विभागाचा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल.
डॉ. सुभाष साळुंखे, अध्यक्ष, राज्य गोवर टास्क फोर्स