अवयवदान हे समाजाप्रती मोठे कार्य आहे. चांगल्या उच्च प्रतीच्या वैद्यकीय सेवेने अवयवदानाची गती वाढवता येणे शक्य आहे. भारतात सरकारी रुग्णालयांमध्ये अवयव दात्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत डॉ. सुनील श्रॉफ यांनी व्यक्त केले. शनिवारी भायखळा येथील ग्रांट वैद्यकीय महाविद्यालयातील भूलशास्त्र विभाग, जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल, मोहन फाउंडेशन तसेच एसबीआय फाउंडेशनच्यावतीने मेंदू मृत रुग्ण आणि अवयव या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी डॉ. श्रॉफ यांनी आपले मत व्यक्त केले. ही कार्यशाळा जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेत डॉ. वर्नन वेल्हो, डॉ. राहुल पंडित, सुजाता अष्टेकर, डॉ. भालचंद्र चिखलकर, डॉ. एस. व्ही. अभ्यंकर, डॉ. प्रियंका धयतडक, डॉ. सुनील श्रॉफ, जया जयराम आदी तज्ज्ञ उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील कोरोना वैद्यकीय टीमचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी अवयवदान पुढे नेण्यासाठी रुग्णालयाने चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवण्याकडे लक्ष द्या असे सूचक विधान केले.
सुजाता अष्टेकर यांनी भारतातील अवयवदान आणि कायदेशीर प्रक्रिया यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. जया जयराम यांनी रुग्णालयातील मृत अवयव दान कार्यक्रमाचे महत्व आणि मृत अवयव दानासाठी कुटुंबातील नातेवाईकांशी कसे बोलावे व त्यांना सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर्स, परावैद्यकिय कर्मचारी, आणि जनसामान्य व्यक्ती यांना अवयवदानासंबंधी शिक्षित करणे, अतिदक्षता विभाग सक्षम करणे, आणि न्याय वैद्यक संबंधित केसेस मधील अवयवदानासाठी सक्षम प्रणाली उपलब्ध असणे गरजेचे आहे असे कार्यशाळेत सर्वानुमते ठरले.
अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय?
मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचार पद्धती आहे.
कोणत्या अवयवांचे दान करता येते?
- मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरलेले असतात.
- उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा मेंदू मृत अवस्थेत जातो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते. परंतु हृदयप्रक्रिया सुरु असते. मेंदू मृत रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते. मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते.
(हेही वाचा – Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती केसांचं तेल वापरून पाहा)
अवयवदान कायदेशीर प्रक्रिया –
- देशात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यांनंतर रुग्णाला मेंदू मृत घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
- मेंदू मृत मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
- मानवी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
- दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया –
- जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर रुग्णाने कुटुंबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.
- अवयवदानासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community