मुंबईत प्रत्येक भागात स्वच्छता राखून अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. मात्र, आयुक्तांच्या या सूचनांचे पालन या पुढे विभागात न झाल्यास आणि अस्वच्छता तसेच बॅनर, होर्डिंग्ज दिसून आल्यास यासाठी थेट विभागाच्या सहायक आयुक्त यांना जबाबदार धरले जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी विभागात स्वच्छता राखण्याची आणि मुंबईला बकाल बनवणाऱ्या बॅनर, होर्डिंग्जच्या जाहिरातींना सहायक आयुक्त यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली आहे.
माझगाव, वांद्रे (पूर्व), कलिना-सांताक्रूझ आणि अंधेरी यासह मुंबईतील विविध भागांमध्ये अचानक भेटीदरम्यान स्वच्छतेचा अभाव दिसून आला असल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील बेकायदा होर्डिंग्ज व बॅनर्समुळे शहराच्या सुशोभिकरणाला बाधा येत असून येत्या काही दिवसांत आपण अचानक भेटी देणार असून, परिस्थिती सुधारली नाही, तर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुंबईतील स्वच्छतेच्या अभावाबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची गंभीर दखल घेत, सर्व विभागीय सहायक आयुक्त आणि विभागीय उपायुक्त यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामध्ये प्रत्येक विभागीय सहायक आयुक्त आणि विभागीय उपायुक्त यांना त्याच्या क्षेत्राचा नकाशा तयार करून सर्व भागात चोवीस तास स्वच्छता राखण्यासाठी अधिकाऱ्यांना नियुक्त करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय कोणताही कचरा आणि डेब्रिज २४ तासांच्या आत काढून टाकण्यात यावे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज उतरवण्यापासून रोखण्यासाठी योजना आखाव्यात तसेच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी स्वच्छता दूत आणि इतर घनकचरा कर्मचारी यांचा वापर करण्यात यावा.
(हेही वाचा – Apmc Market : वातावरणातील वाढत्या उष्णतेचा पालेभाज्यांवर परिणाम, भाज्या सुकून खराब होण्याचे प्रमाण वाढले)
शौचालयांच्या स्वच्छतेचे मूल्यांकनासाठी दररोज दोन तास भेटी
सर्व सार्वजनिक शौचालये दररोज स्वच्छ आणि दिवसातून ५ वेळा स्वच्छ केली जावीत. तसेच प्रत्येक विभागीय सहायक आयुक्त विभागीय उपायुक्त यांनी रस्त्यांवरील आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी सकाळी ०९ ते ११या दरम्यान किमान २तास विभागांत भेटी द्याव्यात. मात्र, कोणत्याही परिसरात किंवा स्वच्छतागृहात स्वच्छता असमाधानकारक असल्याचे आढळल्यास संबंधित तथा जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.
अनधिकृत बॅनर/होर्डिंग्ज काढण्याची कारवाई शनिवारपासून सुरू केली जाईल. आणि त्यानंतरही ते सुरू राहील. प्रत्येक विभागीय सहायक आयुक्त आणि विभागीय उपायुक्त हे आपला दैनिक कामाचा अहवाल अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर करतील. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे न केल्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सहाय्यक आयुक्ताला वॉर्डकरता जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशाराच आयुक्तांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community