आकडी आणि फिट या त्रासापासून वाचण्यासाठी नित्यनेमाने औषधे घेणे आवश्यक असते. मात्र 20 ते 30% रुग्ण व्यवस्थित औषधे घेत नाहीत, परिणामी त्यांना वारंवार फिट येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या रुग्णांनी औषधाकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन परळ येथील केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी केले. विभागाच्या आकडेवारीनुसार शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या संख्येत प्रौढाचे प्रमाण जास्त असून आतापर्यंत 650 शस्त्रक्रियांच्या नोंदीत 543 प्रौढ वयोगटातील रुग्ण आहेत.
विभाग गेल्या वीस वर्षापासून कार्यरत
केईएम रुग्णालयात फिट येणाऱ्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी सुरु केलेले अतिदक्षता काळजी विभाग आता न्यूरोलोजी विभागात हलवण्यात आला आहे. जागतिक अपस्मार दिनानिमित्ताने या विभागाचे अधिष्ठात्यांच्या हस्ते उदघाटन झाले. या विभागात फिट येणाऱ्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना 72 तासांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येईल. फिट येण्याचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेत उपचाराची दिशा ठरते. दोन खाटासह रुग्णांची तीन दिवस तंत्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने देखरेख ठेवली जाईल. हा विभाग गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहेत. वीस वर्षांच्या काळात फिट आलेल्या 650 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यापैकी 532 प्रौढ होते व 120 रुग्ण लहान मुले होती. फिटच्या उपचारात चुकीचे निदान किंवा चुकीची औषधे घेणाऱ्या 20 ते 30% रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची शक्यता असते.
(हेही वाचा लव्ह जिहाद : आफताबने हत्या केलेली हिंदू युवती होती गर्भवती?)
मेंदूवर होणारी शस्त्रक्रिया केवळ केईएम रुग्णालयात उपलब्ध
खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांच्या किंमती 7 लाखांच्या घरात पोहोचलेल्या असताना केईएम रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केवळ 5 हजारात उपलब्ध आहे. तीन दिवसांच्या उपचाराचा खर्च खासगी रुग्णालयात 70 हजारांपर्यंत पोहोचतो, मात्र केईएम रुग्णालयात हा खर्च 7 हजार रुपये एवढा आकारला जातो. या 72 तासात रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही, तरच शस्त्रक्रिया सुचवली जाते. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतरही कित्येकदा मेंदूत गुंतागुंत तयार होते, अशावेळी शस्त्रक्रियांचा खर्च किमान 40 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. राज्यभरात फिटवर उपाययोजना म्हणून मेंदूवर होणारी शस्त्रक्रिया केवळ केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे. रुग्णांननी फिट तसेच आकडीचे प्रमाण वाढत असल्यास तातडीने उपचाराला सुरुवात करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. रावत यांनी केले. या कार्यक्रमाला न्यूरोसर्जन डॉ. दत्तात्रय मुजुमदार, डॉ. नीरज जैन तसेच मनसोपचारज्ञ डॉ. नीना सावंत यादेखील उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community