केंद्र सरकारकडून सट्टेबाजीच्या जाहिरातींपासून (बेटिंग-साईटस) दूर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत ओटीटी प्लॅटफॉर्म आणि खासगी वाहिन्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
( हेही वाचा : आपल्याला कोविडची बाधा झाली होती का? तर होऊ शकते ‘ती’ तपासणी! )
बेटिंग आणि जुगार हे बेकायदेशीर
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ तसेच खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल सारख्या ओव्हर-द-टॉप ओटीटी प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवण्याविरुद्ध ही कठोर सूचना जारी केली आहे. सरकारच्या नियमावलीचे पालन न केल्यास कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. मंत्रालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, प्रमोशनल कंटेंट आणि बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती अजूनही काही बातम्यांच्या प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत. काही ऑनलाइन ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मने डिजिटल मीडियावर सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करण्यासाठी बातम्यांच्या वेबसाइट्सचा वापर सरोगेट प्रॉडक्ट म्हणून करण्यास सुरुवात केली आहे.
डिजिटल मीडियावर दाखवल्या जाऊ शकत नाहीत
भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार हे बेकायदेशीर आहेत. आपल्या अॅडव्हायजरीमध्ये, सरकारने म्हटले आहे की, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी आणि फसव्या जाहिरातींच्या समर्थनासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या परिच्छेद 9 नुसार, असे लक्षात आले आहे की, बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर असल्याने, ऑनलाइन ऑफशोअर बेटिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मच्या जाहिराती देखील प्रतिबंधित आहेत. माहिती तंत्रज्ञान (डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम 2021 नुसार, बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती ही एक बेकायदेशीर गोष्ट असून डिजिटल मीडियावर दाखवल्या जाऊ शकत नाहीत असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community