पुणेकरांना २ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम! अन्यथा… 

पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. मुंबईलाही मागे टाकत जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सार्वधिक बनली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने येथील आढावा घेतला. 

95

पुण्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईलाही मागे टाकत पुण्यातील रुग्ण संख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी, २६ मार्च रोजी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत नियमाचे कडक पालन करा, अन्यथा लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा दिला.

नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन! 

या बैठकीत अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागाची समीक्षा केली. त्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुसार त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील महत्वाचा निर्णय २ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. लॉकडाऊन सारखा निर्णय हा गोरगरिबांच्या रोजीरोटीवर पाय देणारा असतो, त्यामुळे तशी परिस्थिती ओढावू नये याकरता नागरिकांनी स्वतःच नियमाचे पालन करावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. सुदैवाने मृत्युदर कमी आहे. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने यावर राज्य सरकारला कठोर निर्णय घेण्यास भाग पडू नये, असेही पवार म्हणाले.

(हेही वाचा : कोरोनाबाधितांची माहिती महापालिकेलाच नाही…)

बैठकीत हे झाले निर्णय! 

  • याआधी कोरोनासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जात होत्या, आता ५० टक्के खाटा आरक्षित केल्या जातील.
  • १ एप्रिलपासून लोकप्रतिनिधींचे सर्व कार्यक्रम आणि खासगी कार्यक्रम यांवर बंदी घालण्यात येईल.
  • शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
  • मॉल आणि सिनेमागृहांमध्ये ५० टक्के उपस्थिती. सार्वजनिक बस सेवा सुरु राहणार.
  • लग्न समारंभात ५० जणांचीच उपस्थिती, तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांची उपस्थिती.
  • सार्वजनिक पार्क, बगीचे केवळ सकाळी उघडतील, त्यानंतर दिवसभरासाठी बंद राहतील.

लसीकरण केंद्र वाढवणार! 

पुण्यात सध्या ३१६ लसीकरण केंद्रे आहेत, ही संख्या जर दुप्पट केली, तर पुण्यात लसीकरणाचा कार्यक्रम जलदगतीने होईल आणि अधिकधिक नागरिकांचे लसीकरण होईल, असे आम्ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितले आहे, त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.