रवी पुजारीच्या अटकेनंतर पुजारी टोळीला घरघर लागली आहे. बॉस आतमध्ये असल्यामुळे बाहेरची कामे मिळत नसल्याने जगायचे कसे, या विचारात असणाऱ्या पुजारी टोळीच्या शार्पशूटरने चक्क स्वतः जवळील पिस्तुल आणि काडतुसे विकायला काढली होती, परंतु विकण्यापूर्वीच हा शार्प शूटर पोलिसांच्या तावडीत सापडला.
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक करण्यात आलेल्या शार्प शूटरकडून दोन पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सादिक बंगाली असे या शार्प शुटरचे नाव आहे. रवी आणि सुरेश पुजारी या दोघांसाठी शूटरचे काम करणारा बंगाली याची बॉलिवूड आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये दहशत होती. एकट्या बंगालीवर मुंबई आणि पुण्यात १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
(हेही वाचा : पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी, भाजपची मदत थोडी, प्रसिद्धी मात्र मोठी!)
रवी पुजारीच्या अटकेनंतर कामे झाली बंद!
पुण्यातील लोणावळा परिसरात राहणारा सादिक बंगाली हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारीच्या सांगण्यावरून बॉलिवूड आणि बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर जाऊन गोळीबार करून पुजारी टोळीची दहशत निर्माण करीत होता. पुजारी टोळीकडून बंगालीला या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळत होती. मात्र रवी पुजारीची अटक आणि सुरेश पुजारी हा अंडरग्राउंड झाल्यामुळे पुजारी टोळीची दहशत संपली आणि बंगालीला काम मिळणेही बंद झाले होते. त्यात कोरोना, लॉकडाऊनमुळे हालत आणखी खराब झाल्यामुळे बंगाली हा आर्थिक अडचणीत आला होता.
… आणि बंगाली जाळ्यात सापडला!
काम मिळत नसल्यामुळे पिस्तुल आणि काडतुसे यांचे काय करायचे म्हणून तो पिस्तुल आणि काडतुसे विकण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. नेमकी खंडणी विरोधी पथकाला त्याची टीप लागली आणि मुंबईतील कॉटन ग्रीन, एअर फॉर्स रोडवर त्याची मोटारसायकल अडवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून दोन पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली.
Join Our WhatsApp Community