मालाडनंतर आता ठाण्यातून जाणारे महापालिकेचे वॉटर टनेल बोअरवेलमुळे फुटले

प्रातिनिधीक छायाचित्र
ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरु असताना हानी झाली आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या जल बोगद्याद्वारे भांडुप संकुल येथे येणारा पाणीपुरवठा हा जल बोगद्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवार, २० जानेवारी २०२३ पासून बंद केला जाणार आहे.  त्यामुळे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जुन्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्यात येणार आहे.

पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन

या दुरुस्तीच्या कामासाठी मुलुंडमधील वीणा नगर, वैशाली नगर, योगी हिल्स तसेच मुलुंड पश्चिम विभागातील तांबे नगर चेकनाका व ठाणे येथील किसन नगर या परिसरात शुक्रवार २० जानेवारी २०२३ पासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे.  त्यामुळे मुलुंड पश्चिम येथील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

लाखो लिटर पाणी वाया गेले

सन २०१० मध्ये  मालाड लिबर्टी गार्डनजवळ अंधेरी वेरावली येथे जाणारी भूमिगत जल वाहिनी अर्थात अंडर ग्राउंड वॉटर टनेल हे कूपनलिका (बोअरवेल) खोदताना त्याला छिद्र पडले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर २०१३ मध्ये मालाड पूर्व येथील रामलीला मैदानावर परवानगी घेऊन बांधण्यात येणाऱ्या बोअर वेलचा कामात भूमिगत जल बोगद्याच्या तडे गेले होते. या कामाच्या दुरुस्ती करता सुमारे ७ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. आता ठाण्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला कूपनलिकेच्या कामामुळे तडे गेल्याने यावरही किती कोटी रुपये खर्च होणार हे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here