राणीबागेकडूनही शाकाहाराचा पुरस्कार

69

सर्वाधिक शाकाहारपूरक शहर म्हणून पिटा इंडिया या संस्थेचा २०२१चा पुरस्कार मुंबईला प्राप्त झाला असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला असतानाच राणीबागेतील उपहारगृह अर्थात कॅफेटेरिया हेही शुध्द शाकाहारीच असणार आहे. या उपहारगृहात कोणतेही मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार नाही. त्यामुळे आधी पिटा इंडिया शाकाहारपूरक शहराचा पुरस्कार आणि त्यानंतर राणीबागेतील उपहारगृहातून मांसाहाराला बाजुला केल्याने शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिका शाकाहाराचा पुरस्कार करत असल्याचे चित्र समोर येत आहे.

शाकाहार उपहारगृहासाठी कंत्राटही दिले

मुंबईत काही वर्षांपासून शाकाहार-मांसाहार यांच्यातील वाद रंगलेला असतानाच मांसाहाराचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘पिटा इंडिया’ संस्थेने २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहार-पूरक शहर पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारून महापौरांनी मुंबई शहर हे शाकाहारांचे असल्याचे दाखवून दिले होते. पण आता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन कक्ष इमारतीतील उपहारगृह हेसुध्दा शुध्द शाकाहारीच असेल. हे उपहारगृह पुढील पाच वर्षांकरता चालवण्यास देण्यासाठी महापालिकेने परिचय ग्लोबल वर्क्स यांना दिले जाणार असून त्यांच्याकडून पहिल्या वर्षात प्रति माह पाच लाख ५० हजार २५ रुपये भाडे आकारले जाणार आहे.

(हेही वाचा खुशखबर! लोकलचे तिकीट, पास UTS वरून काढता येतेय)

सर्व प्रांतीय खाद्यपदार्थ मिळणार

पेंग्विन कक्ष इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे ५३३ चौरस मीटरच्या जागेत हे उपहारगृह आहे. ज्यामध्ये मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, आसन व्यवस्था, पिण्याची पाणी, स्वच्छतागृह, गॅसबॅक आदींची सुविधा आहे. राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी खानपानाची सुविधा म्हणून हे उपहारगृह बनवण्यात आले आहे. जर बाहेरील लोकांना या उपहारगृहात येण्यासाठी त्यांना राणीबागेतील प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. हे उपहारगृह सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहणार असून तिथे २०० माणसांची क्षमता आहे. या उपहारगृहाला सुधार समिती सदस्यांनी भेट दिली असता माजी महापौर श्रध्दा जाधव आणि भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांनी या उपहारगृहातील खाद्यपदार्थांविषयी विचारणा केली असता राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी याठिकाणी महाराष्ट्रीयन, पंजाबी, दक्षिण भारतीय व काँटीनेंटल या चार प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, अशी माहिती दिली. बाहेरील नागरिकांना या उपहारगृहात यायचे असेल तर त्यांना प्रवेश तिकीट घेऊन यावे लागेल, असे सांगितले. तर याठिकाणी देण्यात येणारे खाद्यपदार्थ हे शाकाहारीच असणार आहेत. मांसाहार ठेवल्यास उंदीर, घुशींचा प्रार्दुभाव वाढून अस्वच्छता निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट करत मांसाहारी पदार्थ उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.