पावसाचा जोर वाढताच मुंबईत पावसाळी आजारांमुळे रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात मोठ्या संख्येने वाढल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सात दिवसांच्या कालावधीत पावसाळी आजारांमध्ये ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लेप्टोचे रुग्ण वाढत असताना मुंबईत गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असताना मुंबईत आठवडाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढल्याचे चित्र पालिकेने जाहीर केलेल्या आठवडाभरातील पावसाळी आजारांच्या आकडेवारीतून दिसून आले.
१० जुलैपर्यंत मलेरियाचे ११९ रुग्ण मुंबईभरात आढळले होते. मात्र १७ जुलैपर्यंत ही वाढ २४२ पर्यंत आढळली. डेंग्यूचे रुग्ण १९ वरुन ३३ वर पोहोचले. गॅस्ट्रोच्या रुग्णांनी तीनशेचा आकडा पार केला. गॅस्ट्रोचे ३४० रुग्ण आढळले. तर हेपेटायटीसचे ३८ रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. स्वाईन फ्लू हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात आढळतो. पावसाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळतात. समशितोष्ण कटिबंधात हा आजार प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामान असलेल्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात.
स्वाईनफ्लूच्या आजाराची लक्षणे
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा
- लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात
स्वाईन फ्लू आजाराच्या प्रसाराचे माध्यम व निदान
- इन्फ्लूएन्झा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होतो. हवेच्या माध्यमातून स्वाईन फ्लू पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून तसेच खोकल्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून निरोगी व्यक्तीकडे जातात.
- आरटीपीसीआर तपासणीतून राज्यातील तीन आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, मुंबईतील हाफकिन संशोधन संस्था तसेच कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात ही चाचणी उपलब्ध आहे.
(हेही वाचा विनापरवाना सुरु असलेल्या २०४ कंपन्यांमुळे कामवारी नदीचे अस्तित्व धोक्यात)
उपचार
ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.
काय टाळाल?
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका
प्रतिबंधात्मक उपाय
वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहार
डेंग्यूविषयी
डेंग्यू हा एडिस एजिप्टाय डासामुळे होणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे.
डेंग्यूची लक्षणे
सतत तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळयांच्यामागे दुखणे, भूक मंदावणे, मळमळणे, पोटदुखी, त्वचेवर पुरळ येणे तसेच नाक, हिरड्या व गुदद्वारातून रक्तस्त्राव
निदान व उपचार
- रक्तजल चाचणीतून डेंग्यूचे निदान होते. डेंग्यूवर निश्चित औषधोपचार नाहीत. रुग्णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.
- डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास त्या रुग्णआला संपूर्ण विश्रांती द्यावी
- रुग्णाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी तापाच्या आजारावर औषधे द्यावीत.
- रुग्णाला फळांचा रस तसेच ओ.आर.एस.चे द्रावण द्यावे
- वैद्यकीय आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण
प्रतिबंधात्मक उपाय
- आठवड्यातून एकदा किमान घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत
- पाणी साठवलेल्या सर्व भांड्यांना योग्य पद्धतीने झाकण लावावे
- घराभोवती जागा स्वच्छ आणि कोरडी करावी
- घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसलेले टाकाऊ साहित्य ठेऊ नये