राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे एकामागो एक शहरातील शाळांना टाळे लावण्यास सुरूवात झाली आहे. ३ जानेवारी रोजी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांतील शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे शहरांतील शाळांना टाळे लावण्याचा निर्णय उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करुन शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे.
सोमवारी मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक होत आहे. या बैठकीत पहिली ते नववी पर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या शाळा किती तारखेपर्यंत बंद राहतील याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
(हेही वाचा ठाण्यात राजकीय कोरोना…)
निर्बंध आणखी वाढण्याची शक्यता
पुण्यात मागील 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या चौपट झाल्याचं समजतंय. पुण्यात तीन जानेवारी रोजी 444 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2,838 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. येथे तीन जानेवारी रोजी 120 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी काळात पुण्यात आणखी कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
मुंबईतील शाळा बंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community