एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र २०१९ पासून राज्यभरातील तब्बल १० हजार निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २९५ कोटी रुपये देणे थकीत आहेत. एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत.
ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही हे खरे असले तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत, त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमेसाठी सुद्धा ३०० रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.
दहा हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे थकवले
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्यासाठी विशेष तरतूद करून निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाचे दहा हजार निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चकरा माराव्या लागत आहे. मात्र अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षांत थकीत देणी मिळण्याअगोदर ७३ पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहितीही बरगे यांनी दिली.
(हेही वाचा सदावर्तेंना जामीन मिळताच जयश्री पाटील प्रकटल्या)
संतापाची लाट
एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून लगेच दिले जातात. मात्र २०१९ पासून राज्यभरातील तब्बल दहा हजार निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २९५ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून चकरा मारत आहेत.
कोरोना व इतर आजार उपचारासाठी पैशाची चन-चन
सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पैकी ७३ कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही ही रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव व इतर आजाराने आजारी झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही, असेही बरगे यांनी यावेळी सांगितले. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप ५ महिने चालला. त्या कालावधीत निवृत कर्मचाऱ्यांना मोफत पासावर राज्यात कुठेही फिरता आले नाही. निवृत कर्मचाऱ्यांना जो मोफत प्रवासाचा सहा महिन्यांचा पास मिळतो त्याची मुदत सुद्धा वाढवून देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.