आता अकरावी प्रवेशाची ‘परीक्षा’!

यंदा मुंबईत दहावीमध्ये एकूण ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि सध्या मुंबईत ३ लाख ७ हजार इतक्या अकरावीसाठी जागा उपलब्ध आहेत.

66

कोरोनामुळे दहावी बोर्डाच्या इतिहासात प्रथमच परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात आले. मात्र हे मूल्यमापन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः गुणांची खैरात वाटली. त्यामुळे निकालातही कधी नव्हे तो इतिहास घडला असून यंदाचा निकाल तब्बल ९९.९४ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५ लाख ७५ हजार ९९४ इतकी झाली आहे. त्या तुलनेत मात्र अकरावी प्रवेशासाठी तेवढ्या जागा उपलब्ध आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा गुणवंत विद्यार्थ्यांची संख्याही अधिक असल्याने मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रवेश देताना अटीतटीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुण्यात अकरावीसाठी सीईटी अनिवार्य होईल! 

यंदा मुंबईत दहावीमध्ये एकूण ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि सध्या मुंबईत ३ लाख ७ हजार इतक्या अकरावीसाठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध जागा यांच्यात तफावत आहेत. म्हणून आता प्रवेश समस्या वाढणार आहे, मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अशा प्रकारे समस्यांची समस्या निर्माण होणार नाही, असा दावा केला आहे. परंतु मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अकरावी प्रवेशाच्या वेळी अटीतटीची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या शहरांमध्ये प्रतिष्ठित महाविद्यालये आहेत. तेथे गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. म्हणून या शहरांमध्ये सर्वच महाविद्यालयांमध्ये सीईटी परीक्षेशिवाय अकरावीचे प्रवेश दिले जाणार नाही, अशी शक्यता शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात.

(हेही वाचा : दहावीचा निकाल जाहीर, पण पाहता येत नाही! ५ तास साईट्स बंद! विद्यार्थी-पालक संतापले!)

ऑगस्टमध्ये सीईटी होणार!

दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्यात सात महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सीईटीच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मंडळावरच सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंडळाकडून सीईटीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. साधारणपणे ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही सीईटी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.