निवडणुकांची कामं किंवा जनगणनेच्या कामांसाठी आतापर्यंत शिक्षकांना कामला लावलं जात होतं, मात्र आता हेच शिक्षक गणेशोत्सवासाठी एसटी आगारामध्ये चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचे नियोजन करताना दिसणार आहे. गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या बाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये लावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश काढले असून, या आदेशानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. चहा वाटपाची ही जबाबदारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना लावण्यात आली आहे.
(हेही वाचा – मनसे-भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट)
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान 8 तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षकापैकी 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.