महिलेनंतर आता तृतीय पंथीयांकडूनही पोलिसाला मारहाण

पंतनगर पोलिसांनी ४ तृतीय पंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

काळबादेवी वाहतूक विभागाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात महिलेने मारहाण केल्याच्या घटनेला काही महिने उलटत नाही, तोच घाटकोपर येथे तृतीय पंथीयांनी विक्रोळी वाहतूक पोलीस विभागातील एका पोलीस शिपायाला मारहाण करून कपडे फाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी ४ तृतीय पंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.

शर्टची कॉलर पकडून पोलिसाली खाली पाडले!

लहू मकासरे, विक्की कांबळे, तनु ठाकूर आणि जेबा शेख अशी अटक करण्यात आलेल्या तृतीय पंथीयांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी हे चौघे एका रिक्षातून विक्रोळीच्या दिशेने जात होती. मात्र वाहतुकीचे नियम मोडत रिक्षातून चार प्रवाशी वाहतूक करीत असल्यामुळे घाटकोपर पूर्व येथील छेडा नगर जंक्शन या ठिकाणी विक्रोळी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई विनोद सोनवणे यांनी रिक्षा थांबवली. त्यानंतर सोनवणे हे ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करीत असताना रिक्षात बदलेले तृतीयपंथ लहू, विक्की, तनु आणि जेबा यांनी वाहतूक पोलीस शिपाई विनोद सोनवणे यांच्याशी हुज्जत घालत सोनवणे यांच्या थेट पोलीस गणवेशची असलेल्या शर्टाची कॉलर पकडून खाली पाडले.

(हेही वाचा : सरकारच्या बदनामीसाठी खलिस्तानींचा कोणता आहे नवा ‘प्लॅन’? वाचा..)

लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

त्यानंतर या चौघा तृतीय पंथीयांनी पोलीस शिपाई विनोद सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सोनवणे यांचा वॉकीटॉकी खेचून जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले. हा सर्व प्रकार अनेकांच्या डोळ्यादेखत सुरु असताना देखील एकही जण या चौघांच्या तावडीतून पोलीस शिपाई सोनवणे यांना सोडवण्यासाठी पुढे आला नाही. सोनवणे यांनी स्वतः हून या चौघांच्या तावडीतून सुटका करून थेट पंतनगर पोलीस ठाणे गाठले. पंतनगर पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, २९४, ४२७, ५०४ आणि ३४ अन्व्यये गुन्हा दाखक करून लहू मकासरे, विक्की कांबळे, तनु ठाकूर आणि जेबा शेख या चौघा तृतीय पंथीयाना अटक करण्यात आली असल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here