मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार आणि त्यानंतर आशिष शर्मा यांची बदली तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच झालेली असतानाच साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेल्या अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू यांचे नाव बदली करण्यात आलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या तिसऱ्या यादीतही आले नाही. महापालिकेत पी. वेलारासू यांच्या बदलीची हवा महापालिका वर्तुळात जोरात सुरु असली तरी प्रत्यक्षात अदलाबदलीतही त्यांचे नाव न आल्याने महापालिकेत आपल्या नावाची खुंटी मजबूत करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांची बदली शिंदे सरकार करणार की येणाऱ्या मान्सूनमधील तारणहार म्हणून त्यांना पावसाळा संपेपर्यंत त्यांची बदलीची फाईल लालफितीत बांधून ठेवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागा जानेवारी २०२० रोजी अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यांची नियुक्ती झाली होती. प्रकल्पाची जबाबदारी पी.वेलारासु यांच्याकडे असताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी,घनकचरा आदी खात्यांच्या कारभार होता. परंतु सिंघल यांची बदली झाल्यानंतर त्या जागी जयश्री भोज यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांच्याकडे सिंघल यांचेकडील पदभार न देता तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या खात्याच्या कारभार तत्कालीन सहआयुक्त (विशेष) यांच्या माध्यमातून स्वतः कडे ठेवला. परंतु पुढे सलील हे मसुरीला प्रशिक्षण करता गेल्याने या महत्वाच्या खात्यांचा कारभार पी. वेलारासु यांच्याकडे आणि तेव्हापासून या विभागांचा कारभार त्यांच्याकडेच आहे. तेव्हापासून प्रकल्पाची जबाबदारी पी. वेलारासू यांच्याकडेच असून महापालिकेत त्यांच्या सेवेची साडेतीन वर्षे पूर्ण होत आली तरी ते महापालिकेत पाय रोवून उभे आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्या विरोधात अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विकास प्रकल्पाच्या कामांविरोधात अनेकदा आरोप केलेले आहेत. त्यांच्या विरोधात अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोप होत असल्याने त्यांची बदली होईल,असे बोलले जात होते. तसेच स्वत: अतिरिक्त आयुक्त प्रकल्प हे आपल्या बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत ३५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले असून काही बदल्या या अदलाबदलीमध्ये झाल्या आहेत. परंतु बुधवारी आलेल्या तिसऱ्या यादीतही पी. वेलारासू यांचे नाव न आल्याने आता वादळामुळे हवेची दिशाच बदलली जावी,त्याप्रमाणे त्यांच्या बदलीचीही हवा बदलल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा Game Jihad : गेम जिहादमधून मुंब्रा येथे 400 हिंदूंचे धर्मांतर )
शासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्याकडे प्रकल्प असल्याने तसेच विविध विभाग व खात्यांचे प्रमुख अभियंते बदलले असल्याने त्यांची बदली पावसाळ्याच्या तोंडावर होणे शक्य वाटत नाही. त्यामुळे त्यांची बदली पावसाळ्यांनतरच होईल,असे बोलले जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे आणि तुंबणारे पाणी या प्रमुख समस्या असून रस्ते व त्यावरील खड्डे बुजवणे आणि नालेसफाईचच्या कामांची माहिती त्यांना असल्याने पावसाळ्याच्या काळात सरकार अशा अधिकाऱ्याची बदली करणार नाही,असे बोलले जात आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्याही बदलीची हवा जोरात सुरु असली तरी प्रत्यक्षात भिडे यांच्यासाठी योग्य अशी जागा नसल्याने तुर्तास तरी त्यांच्या बदलीचीही शक्यता नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कोस्टल रोडचे काम निवडणुकीपूर्वी पुर्णत्वास नेण्यासाठी तसेच अतिरिक्त कार्यभार असलेल्या मुंबई मेट्रोचेही काम योग्य प्रकारे होत असल्याने आश्विनी भिडे यांची बदली करण्याची मानसिकता सरकारची नसेल. कोस्टल रोड पूर्ण करणे हे प्रमुख ध्येय असून नवीन अधिकारी आल्यास या प्रकल्पाच्या कामाला तेवढ्या जबाबदारी हाताळणार नसून मुंबई मेट्रोमधील अनुभवाच्या आधारे भिडे या कोस्टल रोड प्रकल्पाला गती देण्याचे काम करत असल्याने सरकारसाठी त्यांची बदली एकप्रकारे चुकीची ठरु शकते,असेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community