उशिरा सुचलेले शहाणपण! सर्व रुग्णालयांचे फायर-ऑक्सिजन ऑडीट करण्याचे आदेश

राज्यात ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात टॅंकरची वाहतूक करावी, टॅंकर कुठेही वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत.

118

नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. मोठ्या दुर्घटना घडल्यानंतर हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका आता होऊ लागली आहे. दरम्यान मुख्य सचिवांनी ऑक्सिजन टॅंकर्सना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून, पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडीसिवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्विन मुद्गल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा!

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना  हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव कुंटे यांनी  दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये, यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे, याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणूक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाही ना, तो वाया जात आहे का, याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

(हेही वाचा : …तर मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्ण संख्या ‘कमी’ होईल! काय आहे टास्क फोर्सच्या डॉ. ओक यांचे मत?)

जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटर घ्या!

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटर घेण्यात यावे, जेणेकरून सिलिंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी  सांगितले. त्याचबरोबर  जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा

राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतूक करण्यात यावी, कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, असे सांगतानाच शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे, त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडीसिवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.