मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पसरला असून त्यामुळे रुग्ण संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून सरासरी ९ हजार बाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र, या वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णवाहिका आणि शववाहिकाही पुन्हा त्याच संख्येने उपलब्ध करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात सरासरी १९ रुग्णाहिका व शवाहिका उपलब्ध आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना नेणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज पुन्हा एकदा रस्त्यांवर वाजू लागले आहेत. या आवाजानेच आता मुंबईकरांच्या ह्रदयाचा ठोका पुन्हा चुकू लागला आहे.
मागील वर्षीच्या कटु अनुभवामुळे महापालिकेने रुग्णवाहिका वाढवल्या!
मुंबईत मागील वर्षी कोविडच्या आजाराचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णवाहिका अभावी रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना मोठी गैरसोय होत होती. तर रुग्णालयांमध्ये तसेच घरी मृत पावलेल्या व्यक्तीला नेण्यासाठीही शववाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मागील वर्षीच्या या कटु अनुभवातून शिकत महापालिकेने ज्या रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या होत्या, त्याच रुग्णवाहिका आता पूर्ण क्षमतेने रस्त्यांवर उतरवल्या आहेत. तसेच शववाहिका तेवढ्याच आवश्यकतेनुसार उपलब्ध असल्याने आतापर्यंत रुग्णवाहिकांच्या नावाने बोंबाबोंब दिसत नाही. त्या तुलनेत आयसीयू आणि ऑक्सिजन बेडच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब सुरु आहे. एका बाजुला महापालिकेच्या कोविड सेंटरमधील सर्वसाधारण बेड रिकामी असून ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडची कमतरता भासत आहे.
(हेही वाचा : ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीकडेच महापालिकेचे दुर्लक्ष!)
४४७ रुग्णवाहिका आणि ३५ शववाहिका उपलब्ध!
मुंबई महापालिकेची कोविड रुग्णालये, कोविड सेंटर, जंबो कोविड सेंटर यामध्ये रुग्णांना वेळीच दाखल करता यावे याकरता त्यांच्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय २४ विभाग कार्यालयांमध्येही अशाप्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने १० एप्रिलपासून ४४७ रुग्णवाहिका आणि ३५ शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सर्व रुग्णवाहिका सर्व रुग्णालय, कोविड सेंटर आणि विभाग कार्यालयांची गरज लक्षात घेवून तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक यमगर यांनी दिली आहे. दहा एप्रिलपूर्वी २९१ रुग्णवाहिका व शववाहिकांचा ताफा होता, त्यामध्ये १५६ ने वाढ करण्यात आली आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या लाटेत घेतली अधिक खबरदारी!
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपप्रमुख अभियंता सुनील सरदार यांनी प्रत्येक कोविड सेंटर, रुग्णालय आणि विभाग कार्यालयाला आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध्या करुन दिल्या आहेत. ज्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कोविडमध्ये रुग्णवाहिका व शववाहिका यांच्याअभावी रुग्णांच्या नातेवाईकांची आरडाओरड तसेच लोकप्रतिनिधींची बोंबाबोब होत नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका व शववाहिका पुन्हा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्यामुळे सध्या रस्त्यांवरुन प्रत्येक धावणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज हा भीतीने काळजात धस्स करून जातो.
उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका
- १०८ क्रमांकाच्या : ४२
- महापालिका : ४८
- परिवहन आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या : ३२३
- बेस्टकडून प्राप्त झालेल्या : ३१