मुंबईच्या रस्त्यांवरील पदपथावर पेव्हरब्लॉक ऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हे धोरणच महापालिकेनेच गुंडाळून ठेवल्याचे पहायला मिळत आहे. महापालिकेच्या ए विभागातील बेब्रॉन स्टेडियमच्या आसपासच्या रस्त्यांवरील पदपथावर सिमेंट काँक्रीट ऐवजी पेव्हर ब्लॉक लावण्यात येत आहे. त्यामुळे नक्की महापालिकेचे पदपथ सुधारणेचे धोरण काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून पेव्हर ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीला पुन्हा एकदा महापालिका हात दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.
२०१८ पासून पेव्हर ब्लॉक बसवण्यास बंदी
मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी रस्त्यांवरील पदपथांवर सर्रास बसवल्या जाणाऱ्या पेव्हर ब्लॉक ऐवजी स्टेन्सिलचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील २०१८ पासून रस्त्यांच्या पदपथावर पेव्हर ब्लॉक बसवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉक ऐवजी पदपथांची सुधारणा सिमेंट काँक्रीटीकरणद्वारे करण्यात येत होती. तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबतचे धोरण संपूर्ण मुंबईत राबवण्याचा निर्णय जारी केला. त्यानुसार ही कार्यवाही सुरु असतानाच आता या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवण्यास सुरुवात केली जात आहे.
(हेही वाचा बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना अखेर जामीन मंजूर)
पेव्हर ब्लॉकवर बंदी असतानाही याचा वापर केला जातो
मरिन ड्राईव्हवरील बाबूभाई एम चिनाय मार्गावर सध्या पेव्हर ब्लॉक बसवण्यात येत आहेत. महापलिकेच्या ए विभागाच्या वतीने या रस्त्यावर पेव्हर ब्लॉकवर बंदी असतानाही याचा वापर केला जात आहे. महापालिकेच्यावतीने सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे धोरण असतानाच या धोरणालाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासलेला पहायला मिळत आहे. अजोय मेहता हे महापालिकेतून गेल्यानंतर त्यांनी राबवलेल्या धोरणालाही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यापूर्वी जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या खालील पदपथावर पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे.
पेव्हर ब्लॉक लावण्यास बंदी
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणीनंतरही सिमेंट काँक्रीटीकरणावर भर देणाऱ्या प्रशासनाकडून आता पुन्हा पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात असल्याने नक्की प्रशासनाचे धोरण आयुक्त बदलताच बदलले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेव्हर ब्लॉक लावण्यास बंदी घातल्यामुळे अनेक पेव्हर ब्लॉक बनवणाऱ्या कंपन्यांचा धंदा बुडाला होता. परंतु पुन्हा एकदा पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात असल्याने या सर्वांचा धंदा पुन्हा एकदा तेजीत आणत त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community