धक्कादायक! रायगडमध्ये पुन्हा कोसळली दरड!

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत मोठी दरड कोसळली आहे. महाडपासून २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी आहे

147

कोकणाला जो काही जलप्रलयाचा विळखा बसला आहे, तो अद्याप काही सुटण्याचे नाव घेत नाही. एका बाजूला चिपळूण, खेड तालुके पावसाच्या पाण्याखाली गेले असताना दुसरीकडे रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याची मालिका सुरु झाली आहे. जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळयी गावात दरड कोसळून ४२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक दिवस नाही होत तोच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे, तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर!

तळीये गावात दरड कोसळल्यानं हाहाकार उडाला आहे. तळीयेमध्ये मदत व बचावकार्य सुरू असतानाच महाड तालुक्यात आणखी एक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत मोठी दरड कोसळली आहे. महाडपासून २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी असून, रायगड किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आजूबाजूला डोंगर भाग असून, दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तळीयेतील दरड दुरर्घटनेनंतर ही घटना घडल्यामुळे हिरकणीवाडीत भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांना जवळच्या पाचाड गावात हलवले जात आहे.

(हेही वाचा : …म्हणून तळयी गावात बचावपथक वेळेत पोहचले नाही! मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण!)

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज!

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीने तडाखा दिला. पाऊस इतका भयंकर होता की, असंख्य गावे पाण्याखाली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ जुलै रोजी तळयी गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आता धोकादायक ठिकाणी वसलेल्या वाड्या-वस्त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे, असे सांगितले आहे. मात्र त्यावर किती तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे, हे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.