सरकारी तेल कपंन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर मंगळवार सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला असून 100.21 रुपये तर डिझेल 91.41 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
आठवड्याभरात इतकी झाली वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ करावी लागत आहे. 22 मार्चपासून आजपर्यंत मार्केटिंग कंपन्यांना 24 मार्च वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागली आहे. म्हणजेच 22 मार्चपासून आतापर्यंत आठ दिवसांत पेट्रोलच्या दरात सात वेळा वाढ झाली आहे. या सात दरवाढीपैकी 22, 23, 25 आणि 26 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर 27 मार्च रोजी पेट्रोलमध्ये 50 पैसे आणि डिझेलमध्ये 55 पैसे, 28 मार्च रोजी पेट्रोलमध्ये 30 पैसे आणि डिझेलमध्ये 35 पैसे आणि मंगळवारी पेट्रोलमध्ये 80 पैसे आणि डिझेलमध्ये 70 पैशांनी वाढ झाली आहे.
( हेही वाचा: किळसवाणा प्रकार! चक्क शौचालयात धुतल्या जात आहेत शिवभोजन थाळ्या )
कोणत्या शहरात किती वाढला भाव
29 मार्चच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 115.02 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये, कोलकात्यात 109.66 रुपये आणि डिझेल 98.60 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 105.92 रुपये आणि डिझेलचा दर 95.98 रुपये प्रति लिटर झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या बाबतीत राजस्थानमधील गंगानगर अजूनही आघाडीवर आहे. मंगळवारी झालेल्या दरवाढीनंतर गंगानगरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 117.14 रुपयांनी तर डिझेल 99.96 रुपयांनी महागले आहे.
Join Our WhatsApp Community