पुन्हा महापालिकेच्या शालेय देखभालीची जबाबदारी क्रिस्टल,ब्रिक्स आणि बीवीजीवरच

मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींची स्वच्छता, सुरक्षा आणि परिसर स्वच्छतेसह इमारत देखभालीसाठी यापूर्वी नेमण्यात आलेल्या तिन्ही कंपन्यांचीच पुन्हा एकदा पुढील तीन वर्षांच्या कामांसाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीची तीन वर्षांची निविदा २०१९ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना वारंवार मुदतवाढ देत तब्बल १६० कोटी रुपयांचे अतिरक्त कंत्राट देण्यात आले. त्यानंतर याच कंपनीला पुढील तीन वर्षांचे ३९१ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.

जुन्या कंपन्यांची निवड

मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्देशानुसार निवृत्त न्यायमूर्ती धनुका यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सर्व महापालिका शालेय इमारतींना स्वच्छता, सुरक्षा आणि परिसर स्वच्छता, इमारत देखभाल प्राधान्याने करण्यात यावी असे म्हटले होते. त्यानुसार महापालिकेअंतर्गत सर्व शाळा इमारतींसाठी अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्याकारणाने इमारत देखभाल सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ सेवा पुरवण्यासाठी, एप्रिल २०२१ मध्ये निविदा मागवली होती. सात परिमंडळांसाठी स्वतंत्र कंत्राट कंपनीची निवड करण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये त्याच जुन्या कंपन्यांची सात परिमंडळांमध्ये निवड करण्यात आली आहे.

शालेय देखभाल दुरुस्तीची कामं

सर्व शाळांचे एकूण १ कोटी ०७ लाख ९१ हजार ०५ चौरस फूट क्षेत्र असून यासाठी सात परिमंडळांमध्ये स्वतंत्र कंपन्यांना कामे बहाल केली आहेत. विशेष सात परिमंडळांमध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस कंपनीला तीन परिमंडळांची तर उर्वरित ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट आणि बीवीजी इंडिया लिमिटेड या कंपन्यांना प्रत्येकी दोन परिमंडळांतील शालेय देखभाल दुरुस्तीची कामं बहाल करण्यात आली आहेत.

हा निव्वळ योगायोग

विशेष म्हणजे या निविदांमध्ये १० कंपन्यांनी भाग घेतला होता. परंतु विद्यमान तीन कंपन्या वगळता अन्य सातही कंपन्या निविदा पात्रता निकषांमध्ये अपात्र ठरल्या. त्यामुळे ज्या कंपन्यांना तीन वर्षांचे कंत्राट दिले होते त्याच कंपन्यांना १६० कोटींचे वाढीव कंत्राट दिल्यानंतर पुन्हा तीन वर्षांच्या कंत्राट कामांसाठी पात्र ठरवणे हा निव्वळ योगायोग असावा,असा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रस्तावाला प्रशासकांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.

वारंवार मुदतवाढ

यापूर्वी याच कामांसाठी सन २०१६-१९ या तीन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. धनुका समितीच्या शिफारशीनुसार या कामांसाठी कंत्राटदारांची निवड करून शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे आदी भागांमधील ३३८ शाळांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या तीन वर्षांसाठी २०९.७८ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट १७ मार्च २०१९ ला संपुष्टात आले. परंतु त्यानंतर त्यांना वारंवार मुदतवाढ देत त्यांचे कंत्राट कायम ठेवण्यात आले.

शाळा बंद असतानाही कोट्यवधी खर्च

निविदा वेळेत न काढता महापालिका अधिकाऱ्यांनी केलेली मदत आणि त्यानंतर कोविड काळाचा फायदा घेऊन निविदा न काढता १६० कोटी रुपयांचे अधिकचे काम या कंपन्यांना देण्यात आले. त्यामुळे हे कंत्राट काम २०९ कोटींवरून ३६८ कोटींवर पोहोचले. विशेष म्हणजे ज्या कोविड काळात शाळा बंद होत्या आणि त्यांचा जराही वापर झाला नाही, त्या काळात तब्बल ९३ कोटी रुपयांच्या कामांचाही समावेश या कंत्राटात करून या वाढीव कंत्राटांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे पाठवला होता.

तीन वर्षांसाठी महापालिका शालेय देखभालीसाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार

परिमंडळ एक :

कंत्राटदार कंपनी : मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस

कंत्राट रक्कम : ३४.९७ कोटी रुपये

परिमंडळ दोन :

कंत्राटदार कंपनी : मेसर्स ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

कंत्राट रक्कम : ८९.३५कोटी रुपये

परिमंडळ तीन :

कंत्राटदार कंपनी : मेसर्स बीवीजी इंडिया लिमिटेड

कंत्राट रक्कम : ४३.२५कोटी रुपये

परिमंडळ चार:

कंत्राटदार कंपनी : मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस

कंत्राट रक्कम : ४९.९८ कोटी रुपये

परिमंडळ पाच:

कंत्राटदार कंपनी : मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस

कंत्राट रक्कम : ५२.०६ कोटी रुपये

परिमंडळ सहा :

कंत्राटदार कंपनी : मेसर्स बीवीजी इंडिया लिमिटेड

कंत्राट रक्कम : ७६.७४ कोटी रुपये

परिमंडळ सात:

कंत्राटदार कंपनी : मेसर्स ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

कंत्राट रक्कम : ४४.७१ कोटी रुपये

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here