समृद्धी महामार्गालगत वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे अँग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश असलेल्या या अँग्रो लॉजिस्टिक पार्कसाठी ३०.६२ कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सहकारी आणि पणन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे राज्य वखार महामंडळामार्फत लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाणार आहे. एकूण सहा हजार मेट्रीक टन साठवणूक क्षमतेची दोन गोदामे, दहा हजार मेट्रीक टन क्षमतेचे सायलो, १४०० चौ.मीटर क्षेत्रफळाचे सामाईक सुविधा केंद्र आणि क्लिनिंग व ग्रेडिंग यार्डची उभारणी केली जाणार आहे.
(हेही वाचा – आता होणार नाही एसटीच्या कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून वाद!)
३०.६२ कोटी रुपये खर्च येणार
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २२.९४ कोटी आणि ७.६८ कोटी रुपयांचा स्वनिधी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत दिला जाणार आहे. शासन आदेशानुसार, या प्रकल्पासाठी राज्य वखार महामंडळाकडे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम सोपविण्यात आले आहे. वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना यासंदर्भात समिती गठीत करुन प्रकल्पाचा आढावा घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community